>> पाच दिवस अधिवेशन, ६ रोजी अर्थसंकल्प
गोवा विधानसभेच्या पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवार दि. ३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून अधिवेशन शुक्रवार दि. ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवार दि. ६ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी म्हादई, सीएए दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, सरकारची आर्थिक स्थिती, एसटी राखिवता आदी मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे.
राज्यात म्हादई, सीएए दुरुस्ती हे प्रमुख चर्चेचे मुद्दे बनलेले आहेत. विरोधी पक्ष कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप व अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी एकत्रितपणे सरकारला विविध विषयावरून कोंडीत पकडण्यासाठी रणनीती तयार केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे मंत्री व आमदारांची बैठक घेऊन विधानसभा अधिवेशनासाठी रणनीतीवर चर्चा केलेली आहे. सत्ताधारी गटाने विरोधकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तर देण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रश्नोत्तराचा तास होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर मंत्र्यांकडून सरकारी कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावर चर्चा केली जाणार आहे. हा ठराव हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडला आहे. या ठरावाला म्हापसाचे आमदार ज्योसुआ डिसोझा आणि कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी अनुमोदन दिले आहे.
सरकारकडून या अधिवेशनात महालेखापालांचा (सीएजी) अहवाल सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर एस्मा कायदा दुरुस्ती, खासगी विद्यापीठ, सहकार कायद्यात दुरुस्ती, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ दुरुस्ती विधेयके सादर केली जाणार आहेत.
डॉ. सावंत यांचा
पहिला अर्थसंकल्प
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून त्यांच्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेच्या मागील पावसाळी अधिवेशनात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येत्या ६ रोजी सादर केल्या जाणारा अर्थसंकल्पामध्ये सर्व विषयाचा समावेश व्हावा या उद्देशाने मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आणि नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी
उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने गोवा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दि. ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पर्वरी विधानसभा सचिवालयाच्या ५०० मीटर परिसर आणि पणजी पोलीस स्टेशन क्षेत्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. या जमावबंदीच्या काळात ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमणे, मिरवणूक काढणे, बंदूक, शस्त्र, लाठी घेऊन फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. ध्वनिक्षेपकाचा वापर करणे, घोषणाबाजी करणे, सार्वजनिक ठिकाणी आग लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून मान्यता घेतलेल्या कार्यक्रमाला हा आदेश लागू होणार नाही.