विधानसभेचे आगामी अधिवेशन फक्त 2 दिवसांचे

0
2

6 व 7 फेब्रुवारीला घेतले जाणार; पहिल्या दिवशी अभिभाषण; दुसऱ्या दिवशी कामकाज

गोवा विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन येत्या 6 व 7 फेब्रुवारी रोजी घेतले जाणार आहे. 2 दिवसीय अधिवेशनाबाबत विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अधिवेशनात फक्त 2 दिवस कामकाज होणार आहे. त्यातील पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण, दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरी आणि खासगी कामकाज होणार आहे.
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा राज्याच्या आठव्या विधानसभेचे आठवे अधिवेशन बोलावण्याचा आदेश काल जारी केला. या दोन दिवसीय अधिवेशनाचा प्रारंभ 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे.

7 फेब्रुवारीला प्रश्नोत्तराचा तास, सदस्यांची खासगी विधेयके आणि ठराव हे कामकाज होणार आहे. या अल्पकालीन अधिवेशनासाठी आमदार केवळ तीन तारांकित प्रश्न आणि 15 अताराकिंत प्रश्न पाठवू शकतात.

ही तर लोकशाहीची थट्टा : आलेमाव
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवस विधानसभेचे अधिवेशन बोलावणे म्हणजे लोकशाहीची केवळ थट्टाच नाही, तर भाजप सरकार राज्यातील ज्वलंत प्रश्नांना तोंड देण्यास घाबरत आहे हेही स्पष्ट होत आहे, अशी टीका युरी आलेमाव यांनी केली. भाजप सरकारकडून ज्वलंत मुद्दे दाबून टाकणे, लोकशाही तत्त्वांना तिलांजली देण्याचा प्रयत्न आहे. सरकारचा विरोधकांचे अधिकार कमी करण्याच्या डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

विजय सरदेसाईंचीही टीका
नवीन वर्षात भाजप सरकारने केवळ दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलावून लोकशाहीची हत्या केली आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल केली. राज्यातील जमीन घोटाळा, सरकारी नोकरी घोटाळा आदी ज्वलंत प्रश्नावर विरोधकांनी आवाज उठवू नये म्हणून अधिवेशनाचा कालावधी सरकारने कमी केला आहे, असा आरोपही सरदेसाईंनी केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चमध्येच
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची घोषणा केली होती. तथापि, राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प मार्च 2025 मध्ये सादर केला जाणार आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.