विधानसभा सदस्यांसाठी गृहकर्ज व्याजदर २ वरून ७ टक्क्यांवर

0
243

राज्यातील विधानसभेच्या सदस्यासाठी असलेल्या गृहकर्ज योजनेचा व्याजदर वार्षिक २ टक्क्यांवरून ७ टक्के असा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोवा विधानसभेच्या सचिवांनी यासंबंधीची एक अधिसूचना सरकारी पत्रकात काल प्रसिद्ध केली आहे.

राज्य विधानसभा सचिवालयाकडून मंत्री, आमदारांसाठी गृहकर्ज योजना राबविली जात आहे. या गृहकर्ज योजनेसाठी वार्षिक २ टक्के व्याज आकारले जात आहे. राज्यातील कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे राज्य सरकारने आपल्या अनेक योजना रद्दबातल केल्या आहेत. सरकारी कर्मचार्‍यासाठीची गृहकर्ज योजना रद्द केली. या योजनेसाठी २ टक्के व्याजदर आकारला जात होता. ही योजना रद्द केल्याने कर्ज घेतलेले अनेक सरकारी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे काही सरकारी कर्मचार्‍यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
सरकारवर टीकाही झाली. त्यामुळे गृहकर्जाच्या व्याज दरात वाढ करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. गोवा विधानसभेच्या सभापतींनी गोवा नियम २००६ मध्ये दुरुस्तीला मान्यता दिली आहे.