विधानसभा वृत्त

0
135

अब्दुल शेखचा मृत्यू हृदयविकारानेच : पार्सेकर
१०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेताना अब्दुल सतार शेख या इसमाचे जे निधन झाले ते १०८ रुग्णवाहिकेत प्राणवायू (ऑक्सिजन) नसल्याने नव्हे तर सदर व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला अशी माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली.
शून्य तासाला अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सदर प्रश्‍न उपस्थित केला होता. राज्यातील आणीबाणी सेवा पूर्णपणे कोलमडून पडलेली असून त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे सभागृहाच्या नजरेस आणून देताना श्री. सरदेसाई यांनी, १०८ रुग्णवाहिकेत प्राणवायू नसल्याने गोमेकॉत उपचारासाठी नेण्यात येणार्‍या अब्दुल सतार शेख या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप सरदेसाई यांनी सभागृहात केला. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
यासंबंधी पुढे बोलताना श्री. पार्सेकर म्हणाले की, दर एक रुग्णाचे प्राण वाचवणे हे आरोग्य खात्याचे कर्तव्य आहे. ज्या १०८ रुग्णवाहिकेतून वरील रुग्णाला गोमेकॉत नेण्यात आले त्या रुग्णवाहिकेत प्राणवायू कमी होती ही वस्तुस्थिती आहे. मात्र, प्राणवायूअभावी सदर रुग्णाचा मृत्यू झाला हे सत्य नसल्याचे पार्सेकर म्हणाले. वरील रुग्णावर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया झालेली होती. त्याला हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्याचे रक्तातील साखरेचे प्रमाणही खूपच वाढलेले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला मात्र, ज्या रुग्णवाहिकेतून सदर व्यक्तीला नेले जात होते त्या रुग्णवाहिकेत प्राणवायू कमी असल्याची कल्पना नातेवाईकांना देणयात आली होती. तसेच सदर रुग्णवाहिका फोंड्याजवळ पोहोचली असता तेथे पूर्ण प्राणवायू असलेली रुग्णवाहिका मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे जेव्हा रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा तो प्राणवायूच्या अभावामुळेच झाल्याचा नातेवाईकांचा समज झाल्याचे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी हस्तक्षेप करताना आमदार विश्वजीत राणे यांनी, गेली दोन वर्षे १०८ रुग्णवाहिकांचे ऑडिट झालेले नाही. १०८ रुग्णवाहिकांची दुरूस्ती, दर्जा याकडे आरोग्य खात्याचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप केला व ऑडिट करण्याची मागणी केली.
यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की वरील घटना घडल्यानंतर काही मिनिटांतच आपण डॉक्टरांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली. सदर रुग्णाचा प्राणवायू अभावी नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांनी त्या प्रकरणी दिलेला अहवाल स्वीकारणेच योग्य व शहाणपणाचे असून आता विनाकारण त्याबाबत संशय व्यक्त करण्यात अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
तिळारीपासून आमठाणेपर्यंत जलवाहिनी  टाकणार : मुख्यमंत्री
तिळारी ते आमठाणेपर्यंत जलवाहिनीद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार असून या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महाराष्ट्राच्या मुख्मयंत्र्यांसोबत बैठक घेतल्याचे सांगितले. पर्वरी पठारावर पाणी जिरवा व्यवस्था करण्याच्या रोहन खवटे यांच्या सूचनेवर विचार करण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
तिळारी जलसिंचन महामंडळाचा गाशा गुंडाळण्याची तयारी पूर्ण झाली असून महामंडलातर्फे केले जाणारे काम जलस्त्रोत खाते करणार असल्याचे या खात्याचे मंत्री या नात्याने दयानंद मांद्रेकर यांनी चर्चेस उत्तर देताना सांगितले.
मंडूर आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत : आरोग्यमंत्री
सांत आंद्रे मतदारसंघातील मंडूर ग्रामीण आरोग्य केंद्राची इमारत ही अत्यंत जुनी झालेली असल्याने ती मोडून त्या जागी या केंद्रासाठी नवी इमारत बांधण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले.
प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विष्णू वाघ यांनी यासंबंधीचा मूळ प्रश्‍न उपस्थित केला होता. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाखाली राज्यात किती ग्रामीण आरोग्य केंद्रे आहेत असा प्रश्‍न यांनी उपस्थित केला होता. या प्रश्‍नाचे उत्तर देताना या घडीला राज्यात मंडूर हे फक्त एकच ग्रामीण आरोग्य केंद्र अस्तित्वात असल्याची माहिती पार्सेकर यांनी दिली. १९६७ साली ते एका भाड्याच्या खोलीत सुरू करण्यात आले होते. नंतर १९७४ साली ते स्वत:च्या इमारतीत हलवण्यात आले होते, अशी माहिती पार्सेकर यानी दिली.
आतापर्यंत या केंद्राच्या इमारतीची किती वेळा दुरुस्ती करण्यात आली असा प्रश्‍न यावेळी वाघ यांनी विचारला असता या इमारतीची एकदाही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे पार्सेकर यांनी यावेळी माहिती देताना सांगितले. गोमेकॉ कांपाल येथे असताना मंडूर आरोग्य केंद्राचा लोक चांगला लाभ उठवत असत. मात्र, गोमेकॉ बांबोळी येथे हलवण्यात आल्यानंतर ते मंडूर आरोग्यकेंद्रात जाणार्‍या लोकांसाठी गोमेकॉ जवळ झाल्याने मंडूर केंद्रात जाणार्‍यांची संख्या घटली. परिणामी या केंद्राकडे दुर्लक्ष झाले असावे असे पार्सेकर म्हणाले. आता या केंद्राची जुनी झालेली इमारत पाडून त्या जागी नवी इमारत बांधण्यात येईल, असे पार्सेकर यांनी स्पष्ट केले.
कला आणि संस्कृती क्षेत्रात आणीबाणी : सरदेसाईंचा आरोप
कला आणि संस्कृती क्षेत्रात अघोषित आणिबाणी चालू असल्याचा आरोप फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला. मडगाव रवींद्र भवनात तियात्र सादरकरणार्‍यांकडून आमदार, मंत्री वा सरकार या महनीय व्यक्तींवर टीका करणार नाहीअसे लेखी हमीपत्र लिहून घेतले जाते. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचाच प्रकार असल्याचा आरोप श्री.सरदेसाई यांनी केला.
सांतआंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी यावेळी सरदेसाई यांच्या या भूमिकेचे समर्थन केले. तियात्र हा केवळ कलेचा प्रकार नसून तो समाज प्रबोधनाचाही प्रकार आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे योग्य नसल्याचे वाघ यांनी सांगितले. यावेळी मिकी पाशेको व बेंजामिन सिल्वा यांनी, सरकारच्या धोरणाचे समर्थन केले.
रोमी लिपीतील पुरस्कार देण्याची मागणी कायतान सिल्वा व बेंजामिन सिल्वा यांनी केली. तियात्रिस्तांनी चोरांना हिरो बनवण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वीच्या मंत्र्यांनी दारिद्य्र रेषेवरील लोकांनाही दारिद्य्ररेषेखाली आणल्याचा आरोप यावेळी श्री. सिल्वा यांनी केला.
तियात्रांवर सरकार निर्बंध घालू शकत नाही. ते काम सरकारने तियात्र अकादमीला विश्‍वासात घेऊन करावे असे आवाहन थिवीचे आमदार किरण कांदोळकर यांनी केले. तिळारी ते आमठाणेपर्यंत जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.
कलाकारांच्या दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा अशी विनंती आमदार पांडुरंग मडकईकर यांनी केली.