इरा एक्झोटिका प्रकल्पास परवाने मिळाल्याने मान्यता : मुख्यमंत्री

0
122

मेसर्स इरा एक्झोटिका प्रा. लिमि. यांच्या मालकीच्या कुडतरी येथील ८० खोल्यांच्या हॉटेल प्रकल्पास आवश्यक ते सर्व परवाने मिळालेले असल्याने सरकारने या प्रकल्पास मान्यता दिली आहे. त्यामुळे परवाना मागे घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. नियमानुसार २ मीटर लांबीच्या रस्त्यासह तीन अटी पूर्ण न केल्यास प्रकल्पांना ऑक्युपेन्सी दाखला मिळू शकणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या लक्षवेधी सूचनेवर सांगितले.
गुंतवणूक धोरणाबाबत आपले सरकार ठाम आहे. प्रस्ताव मान्य झाल्यानंतर गुंतवणुकदारांना अडथळा आणणार नाही तसे केल्यास विपरीत परिणाम होईल, असे पर्रीकर यांनी सांगितले.
वरील प्रकल्पास तेथील ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे आपल्याला जनतेबरोबर राहणे भाग पडले असे सांगून २०२१च्या प्रादेशिक आराखड्यानुसार वरील भागाचा विकासबंदी विभागात समावेश होत आहे, असे लॉरेन्स यांनी सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रकल्पासाठी २००९ मध्ये सनद दिली होती. त्यामुळे नव्या आराखड्यातील तरतुदी लागू होऊ शकत नाही, असे सांगितले. मूळ जमीन प्रकल्पाचे मालक रमाकांत शर्मा यांनी विजय यशवंत सरदेसाई, सूरज लोटलीकर व उषा लोटलीकर यांच्या मेसर्स सुवी इन्फ्रा या फर्मकडून ३ कोटी रुपयांचे विक्रीपत्र करून खरेदी केली होती, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली. आमदार लॉरेन्स या प्रकल्पास आता विरोध करीत असले तरी तेथे २ मीटर लांबीचा रस्ता व्हावा म्हणून दोन पत्रे सरकारला पाठविली होती, असे पर्रीकर यांनी सांगितले त्यामुळे लॉरेन्स पेचात आले. या विषयावरील चर्चा चालू असतानाच नीलेश काब्राल उठले व एका बाजूने गोंयकारांनो जायात जागे’ अशी गीत गात गोवा वाचविण्याच्या गोष्टी सांगणे व त्याच लोकांनी गोव्यातील जमिनी बिगर गोमंतकीयांना विकून टाकणे, हा कसला न्याय, असा प्रश्‍न केला. त्यामुळे लॉरेन्स खवळले. सभागृहातील वातावरण यावेळी बरेच तापले. नुवेंचे आमदार मिकी पाशेको व दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनीही काब्राल यांच्या सुरात सूर मिळविला. त्यानंतर आमदार लॉरेन्स सौम्य झाले.
हळदोण्यातील ‘त्या’ कंत्राटदारांची  कंत्राटे रद्द करणार : ढवळीकर
हळदोणे मतदारसंघातील कामे अर्धवट सोडल्याने दिनेश केणी व रामचंद्र मुळे या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत दिले. आमदार ग्लेन टिकलो. यांच्या प्रश्‍नावर मंत्री ढवळीकर बोलत होते.
डॉ. दर्शना नाईक यांचे विधानसभेत अभिनंदन
भारतीय वैद्यकीय मंडळाचा प्रतिष्ठेचा डॉ. रामचंद्र मूर्ती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मानसोपचार तज्ञ डॉ. दर्शना लक्ष्मण नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव काल विधानसभेत संमत करण्यात आला. हा ठराव आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी मांडला तर उद्योगमंत्री तथा शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी त्याला अनुमोदन दिले.