हल्लाप्रकरणी पोलीस चौकशीच्या गतीबाबत तक्रार नाही : वाघ
गेल्यावर्षी रेवोडा येथे आपल्यावर झालेल्या हल्ल्याची ज्या पद्धतीने पोलीस चौकशी करीत आहेत, त्या पद्धतीने ती चालू द्या. त्या विषयावरील चर्चा वाढवू नये, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावरील चर्चेवेळी आमदार विष्णू वाघ यांनी सांगितल्याने याबाबत चर्चा पुढे जाऊ शकली नाही. गेल्या १९ डिसेंबर रोजी श्री. वाघ यांच्यावर रेवोडा येथे झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी पोलिसांनी वाघ यांना चौकशीसाठी बोलावले होते काय? असा प्रश्न सरदेसाई यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाघ त्यावेळी इस्पितळात होते, असे उत्तर दिले. या प्रकरणी चौकशी चालू आहे. याप्रकरणी एकाला अटकही केली होती. चौकशी लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यास आपण तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर सरदेसाई यांनी वाघ यांच्या पत्नीने काही लोकांनी वाघ यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती, असा भाषणात आरोप केला होता, असे सांगताच भाषणातून केल्या जाणार्या आरोपांवरून चौकशी केल्यास पोलिसांना तेच काम द्यावे लागेल असे पर्रीकर यांनी सांगितले.
सरदेसाई हा विषय पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिसून आल्याने वाघ यांनी आपल्या या प्रकरणामागच्या भावना ऐकून घेण्याची विनंती केली. सभापतींनी मान्यता देताच वाघ यांनी वरील विधान केले. सभापतींनीही वाघ यांच्या भूमिकेवर आपण समाधानी असल्याचे सांगून सरदेसाई यांना बोलण्यास मान्यता दिली नाही.
मसाज पार्लर कायद्यात दुरुस्तीसाठी विधेयक
राज्यातील मसाज पार्लर्स व स्पा येथे मालीशच्या नावाखाली जे गैरप्रकार चालतात ते रोखण्यासाठी चालू अधिवेशनात सरकार मसाज पार्लर कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक आणणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहमंत्री या नात्याने बोलताना दिली.
दुरुस्ती विधेयकातून उपाधीक्षक व त्या पदावरील पोलिसांना मसाज पार्लर्सच्या नावाखाली वेश्या व्यवसायासारखे गैरप्रकार करणार्यांवर कारवाई करण्यासाठीचे विशेष अधिकार देण्यात येतील. त्यात अशा लोकांना दंड देणे, आवश्यक त्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेण्याचे अधिकार देण्यात येतील. पार्लरमध्ये कोणत्या प्रकारचे मसाज करण्यात येते त्यासंबंधीचे सगळे तपशील पार्लर बाहेर फलकावर लावण्याची सक्ती त्यांना करण्यात येणार असल्याची माहितीही पर्रीकर यांनी दिली.
आमदार मायकल लोबो यांनी काल विधानसभेत आणलेल्या लक्ष्यवेधी सूचनेवर बोलताना त्यानी वरील माहिती दिली. राज्यातील काही मसाज पार्लर्समध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचा आरोप मायकल लोबो यांनी यावेळी केला होता. त्यावर बोलताना पर्रीकर म्हणाले की पार्लर्सवर छापे सोपे काम नव्हे. पोलिसांना बरीच तयारी करावी लागते. अन्यथा ते गोत्यात येऊ शकतात. पोलिसांना आपल्याबरोबर एखाद्या एन्जीओच्या प्रतिनिधीला न्यावे लागते. महिला पोलिसांनाही बरोबर न्यावे लागते. शिवाय पंच साक्षीदार, तसेच एखाद्या व्यक्तीला ग्राहक बनवून पाठवावे लागते. ग्राहक बनून गेलेल्या व्यक्तीकडून मालकाने पैसे घेतल्याचे पुराव्यासह सिध्द करावे लागते.
विदेशींच्या बेकायदा वास्तव्यप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाची मदत घेणार
राज्यात बेकायदा वास्तव्य करणार्या विदेशी नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारला मर्यादीत अधिकार आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने त्यावर योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार रोहन खंवटे यांच्या प्रश्नावर दिले.येथे येणार्या काही विदेशी नागरिकांकडे कोणतेही दाखले नसतात. त्यामुळे ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत. हे ओळखणे कठीण होते.
अनेकजण अमली पदार्थ गैरव्यवसायात गुंतल्याने येथील युवकही त्यांच्या नादी लागत असल्याचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या दर्जासाठी प्रयत्न : नाईक
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रात शिष्टमंडळ घेऊन जाणार असल्याचे आश्वासन समाजकल्याण मंत्री महादेव नाईक यांनी काल बुधवारी गोवा विधानसभेत दिले.
तसेच समाज कल्याण खात्यात ज्या विविध योजना आहेत, त्याविषयी जागृती घडवून आणण्यासाठी शाळा, विद्यालये, पंचायती येथे फिल्ड असिस्टंटना पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री श्री. नाईक यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.