विधानसभा वृत्त

0
137

जुने गोवे ते थोरले गोवे रस्त्याचे सर्वेक्षण करणार : मांद्रेकर
जुने गोवे (ओल्ड गोवा) ते थोरले गोवे (गोवा वेल्हा) या दरम्यान कदंबकालीन महामार्गाचे (राजमार्ग) काही अवशेष अद्याप अस्तित्वात असून या पार्श्‍वभूमीवर भारतीय पुरातत्त्व या महामार्गाचे सर्वेक्षण करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे पुरातत्व खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विष्णू वाघ यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.
जुने गोवे, बायंगिणी, गांवशी, आजोशी, मंडुर, नेवरा व भाटी येथील डोंगराळ भागांत कदंबकालीन ऐतिहासिक स्थळे आहेत याची पुरातत्त्व खात्याला कल्पना आहे काय असा प्रश्‍न आमदार विष्णू वाघ यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना पुरातत्व खात्याने या भागात कोणतेही सर्वेक्षण केलेले नसून अशी ऐतिहासिक स्थळे तेथे आहेच की काय याची खात्याला कल्पना नसल्याचे मंत्री मांद्रेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, जुने गोवे ते थोरले गोवे या दरम्यान कदंबकालीन राजमार्ग (राजबिद) होता याची खात्याला कल्पना आहे. या महामार्गाचे काही अवशेषही अद्याप अस्तित्त्वात आहेत असे मांद्रेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच भारतीय पुरातत्त्व खात्याच्या मदतीने त्याचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आमदार विष्णू वाघ म्हणाले की, गोव्याची पुरातन स्थळे जपून ठेवण्याची गरज आहे. पोर्तुगीज गोव्यात आले तेव्हापासूनचाच इतिहास लोकांना माहित असल्याचे सांगून त्यापूर्वी गोव्यात कदंब, चालुक्य, मौर्य आदी कितीतरी जणांची राजवट होती. त्या काळातील पुरातन स्थळे अथवा अवशेष शिल्लक असतील तर त्यांचे जतन करण्याची गरज असल्याचे वाघ यांनी यावेळी सांगितले. जुने गोवे येथे मोठे कदंबकालीन भुयारी महाल असल्याचेही वाघ यांनी यावेळी सभागृहात सांगितले. आमदार पांडुरंग मडकईकर यांनीही यावेळी जुने गोवे येथे पुरातन स्थळे व त्यांचे अवशेष असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना हवे असल्यास जुने गोवे व परिसरातील सर्व स्थळांचे सर्वेक्षण करू असे आश्‍वासन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी यावेळी दिले.
चौपदरीकरणाचा अडथळा श्रीपादनी हटवला : मुख्यमंत्री
जुने गोवे येथील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास केंद्रीय पुरातत्व खात्याचे अडथळा आणला होता उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांची केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या प्रयत्नामुळे हा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत तेथील रस्त्याचे चौपदरीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
नाईक यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल आमदार विष्णू वाघ यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मांडलेल्या ठरावावर मुख्यमंत्री बोलत होते. सभागृहाने एकमताने वरील ठराव संमत केला. या ठरावावर आमदार मायकल लोबो, उपसभापती अनंत शेट, किरण कांदोळकर, राजन नाईक, गणेश गांवकर, लवू मामलेदार, ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आदींची भाषणे झाली.
श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन
श्रीपाद नाईक यांना पर्यटन व संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र ताबा) म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल काल गोवा विधानसभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा अभिनंदनाचा ठराव भाजप आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी मांडला. यावेळी आमदार माविन गुदिन्हो, विरोधी पक्ष नेते प्रतापसिंह राणे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सहकार मंत्री दीपक ढवळीकर, आमदार नीलेश काब्राल, प्रमोद सावंत, दिगंबर कामत, सुभाष फळदेसाई, रोहन खंवटे आदीनी यावेळी श्रीपाद नाईक यांचे अभिनंदन केले.
श्रीपाद नाईक हे केंद्रीय पर्यटनमंत्री असल्याचे त्यांच्या निवर्णचा गोव्याला लाभ मिळू शकेल, असे मत बहुतेक नेत्यांनी यावेळी व्यक्त केले. श्रीपाद नाईक यांच्या साधेपणाचा व सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या वृत्तीचा यावेळी वरील नेत्यांनी खास उल्लेख केला.
कातिया कुएलोचे अभिनंदन
युवा ऑलिपिकसाठी भारतीय खेळाडू म्हणून नौकानयन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कातिया कुएलो या युवतीचे काल गोवा विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. हा अभिनंदनाचा ठराव आमदार मायकल लोबो यांनी मांडला. कुएलो ही केवळ १४ वर्षांची असून युवा ऑलिम्पिकसाठी निवड झालेली ती पहिली युवती असल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले. तिला प्रशिक्षणासाठी विदेशात जावे लागणार असून त्यासाठी येणारा खर्च सरकारने करावा, अशी मागणी यावेळी लोबो यांनी केली.
यावेळी बोलताना क्रीडामंत्री रमेश तवडकर म्हणले की, कातिया हिला विदेशात प्रशिक्षणासाठी जाण्यास गोवा सरकार पैसे देईल. तर अन्य खर्चही गोवा सरकारतर्फे केला जाईल. त्यांनीही यावेळी कुएलो हिचे अभिनंदन केले.
सांतआंद्रेत ४५९ बीपीएल कुटुंबे : मांद्रेकर
सांत आंद्रे मतदारसंघातील एकूण ४५९ कुटुंबांना दारिद्—यरेषेखालील कुटुंबांना देण्यात येणार्‍या सवलतींचा लाभ मिळतअसल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी काल विधानसभेत दिली.
आमदार विष्णू वाघ यांनी या संदर्भात प्रश्‍न विचारला होता. श्री. वाघयांनी विचारलेल्या अन्य एका प्रश्‍नावर शिरदोण केळबाय देवस्तानचे लवकरच सुशोभीकरण करण्यात असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी दिली.
खोला पंचायत समुद्र किनार्‍यांवर साधन सुविधा उभारणार : परूळेकरखोला ग्रामपंचयातीतील खोला, राजबाग, नुवें, काब-द-राम आदी किनार्‍यांवर विविध साधनसुविधा उभारण्याचा पर्यटन खात्याचा विचार आहे. मात्र, यापैकी काही किनार्‍यांवर जाण्यासाठी रस्तेच नसल्याने कामे अडली असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला विधानसभेत सांगितले. या पार्श्‍वभूमीवर या किनार्‍यांवर जाण्यासाठी रस्ते व अन्य सुविधा उभारण्यासाठी जमीन संपादन करावे लागणार आहे. त्यानंतरच पुढील कामे हाती घेणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खाणगिणी किनार्‍यावर शौचालय, पदपूल, संरक्षक भिंत आदी सुविधा उभारण्याची योजना आहे. या साधनसुविधा उभारण्याचे काम मेसर्स मुरालाग, लखनौ यांना देण्यात आले आहे. खणगिणी किनार्‍यावर साधनसुविधा उभारण्याबरोबरच सौंदर्यीकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, असे परूळेकर यांनी सांगितले.

बेतुल, नुवें, राजबाग, खाकळ, खोला व काब-द-राम या किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्याची जबाबदारी एस्. एन्. भोबे ऍण्ड असोसिएट्‌स प्रा. लिमिटेड, मुंबई यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बेतुल किनार्‍यावर काय करायचे त्याचा विचार चालू आहे.
नुवें व खाकळ या किनार्‍यांवर जाण्यासाठी रस्ते नसल्याने हे रस्ते उभारल्यानंतरच पुढील कामाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे परुळेकर यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांना श्रध्दांजली
हल्लीच कालवश झालेले केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, पत्रकार व साहित्यिक खुशवंत सिंग, कवी-गीतकार सुधीर मोघे, चित्रपट छायाचित्रकार व्ही. के. मूर्ती, अभिनेत्री जोहरा सेहगल, फुटबॉलपटू विकितासांव लोबो, स्वतंत्र्यसैनिक बबन नारायण भट, स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ सावईकर, संगीत दिग्दर्शक आनंद मोडक, क्रिकेटपटू माधव मंत्री, विठ्ठल प्रभुगांवकर व विद्याधर शिलकर यांना काल गोवा विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.