>> मतमोजणीला उरले केवळ सात दिवस; उमेदवारांकडून दावे-प्रतिदावे
गोवा विधानसभेच्या मतमोजणीला आता केवळ सात दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या १४ फेब्रुवारी रोजी ४० जागांसाठी मतदान पार पडले होते. त्यानंतर आता १० मार्च रोजी मतमोजणी होणार असून, निवडणूक रिंगणातील ३०१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढत चालली आहे.
विधानसभा निवडणूक निकालाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. भाजप, कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांना स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकार स्थापनेसाठी प्रादेशिक पक्ष व अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजप, कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी आगामी सरकार स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांशी बोलणी करण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच पक्षापासून दूर गेलेल्या अन्य पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी निवडणूक निकालापूर्वीच सरकार स्थापनेच्या विषयावर चर्चा केली आहे. तसेच कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधलेला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांच्याशी देखील भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
साखळी मतदारसंघातील
निकालाकडे सर्वांचे लक्ष
साखळी मतदारसंघातील निवडणूक निकालाकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. सावंत यांना विजयाची खात्री आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसचे उमेदवार धर्मेश सलगानी यांनी विजयाचा दावा केला आहे.
पणजी मतदारसंघातील निकालाबाबत रंगतदार चर्चा
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष पणजी पणजी मतदारसंघातील निवडणूक निकालाकडे लागलेले आहे. या मतदारसंघातील निकालाबाबत रंगतदार चर्चा सुरू आहेत. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे बाबूश मोन्सेरात, कॉंग्रेसचे एल्विस गोम्स, आपचे वाल्मिकी नाईक हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे चुरशीची लढत अपेक्षित आहे. मतविभागणी होणार असल्याने अनपेक्षित निकाल पाहायला मिळतील, अशी शक्यता आहे.