>> सोमवारपासून चार दिवसीय अधिवेशन
गोवा विधानसभेच्या येत्या २५ जानेवारीपासून सुरू होणार्या चार दिवसीय अधिवेशनात ७५१ प्रश्न, सरकारची सहा विधेयके, चार खासगी विधेयके आणि पाच खासगी ठराव मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सोमवार दि. २५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. या अधिवेशनासाठी आमदारांनी ७५१ प्रश्न पाठविले आहेत. त्यात १९५ तारांकित आणि ५५६ अतारांकित प्रश्नांचा समावेश आहे. या अधिवेशनात तीन दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा, पुरवणी मागण्या व इतर सरकारी कामकाज केले जाणार आहे. असे सभापतींनी सांगितले.
कामकाजात २७ रोजी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, वीजमंत्री, जलस्रोतमंत्री यांच्या खात्याशी निगडीत, २८ रोजी बांधकाममंत्री, आरोग्यमंत्री, कला व संस्कृतीमंत्री, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो यांच्या खात्याशी तर दि. २९ रोजी दोन्ही उपमुख्यमंत्री, पंचायतमंत्री, आणि नगरविकासमंत्री या खात्याशी निगडीत प्रश्न असतील.
अपात्रता याचिकेवर निर्णय नाही
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी याचिका प्रलंबित असल्याने अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यात आलेला नाही. सभापतींसमोर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिका प्रलंबित आहेत, असे सभापती पाटणेकर यांनी सांगितले.