गोवा विधानसभेच्या अंदाजपत्रक समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल घेतली. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील विविध खात्यांना मंजूर निधी आणि खर्च केलेल्या निधी, प्रलंबित निधी याबाबत सविस्तर माहिती येत्या ५ फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत सादर करण्याची सूचना संबंधित अधिकार्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
गोवा विधानसभेची पोस्ट बजेट पुनरावलोकनासंबंधी यापूर्वी कधीच बैठक घेण्यात आलेली नाही. पोस्ट बजेट पुनारावलोनसंबंधी पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पात प्रत्येक खात्याला मंजूर निधी, विनियोग करण्यात आलेला निधी, वापराविना पडून निधी, एका खात्याचा निधी दुसर्या खात्याकडे वळविण्यात आलेला निधी याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. सरकारी अधिकारी १५ व्या वित्त आयोगाच्या बैठकीत व्यस्त असल्याने ही माहिती सादर करण्यात आलेली नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले.
कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या निधीचा पगारासाठी वापर, पाच हजार नोकर भरतीसाठी अर्थसंकल्पात पगारासाठी निधीची तरतूद, लाडली लक्ष्मी व इतर सरकारी योजनासाठी निधीची तरतूद, साधनसुविधा प्रकल्पासाठी निधीची तरतूद, सरकारकडून कंत्राटदारांना वेळेवर बिलांचे पेमेंट आदी विषयाबाबत माहिती सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.
फातोर्डातील विकास प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली होती. तथापि, वित्त खात्याकडून या प्रकल्पासाठी निधीची तरतूद नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. सामूहिक शेतीसंबंधीची फाईल गायब झालेली आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला.