विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करणार

0
110

>> आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. केपे येथील एका विद्यार्थीनीचा ती शिकत असलेल्या विद्यालयातील सुरक्षा रक्षकानेच विनयभंग करण्याची घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण खात्याचे अधिकारी व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सोमवारी बैठक होत असून या बैठकीत विद्यालयातील सुरक्षेच्या प्रश्‍नावर सविस्तर चर्चा होणार आहे.
केपेच्या घटनेची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतलेली असून विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न हा शिक्षण खात्यासाठी सर्वांत महत्वाचा आहे, असे भट म्हणाले. मुलींच्या सुरक्षेच्याबाबतीत आम्ही तडजोड करू शकत नसल्याचे सांगून सोमवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी त्याबाबत सविस्तरपणे चर्चा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास ते शाळेचे डोळे बनू शकतील. विद्यालयात घडणार्‍या सर्व गोष्टी व तेथील हालचाली या कॅमेर्‍यात टिपल्या जातील. त्यामुळे कुणी एखादा गुन्हा केला तर गुन्हेगार पकडला जाईल. त्याचबरोबर गुन्हा करू पाहणार्‍यांना या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा धाकही राहील, असे भट म्हणाले.

केवळ ७ सरकारी विद्यालयात कॅमेरे
विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती यापूर्वीही करण्यात आली होती. मात्र, त्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होऊ शकली नाही. ७७ सरकारी माध्यमिक विद्यालयांपैकी फक्त ७ विद्यालयात सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशी माहितीही भट यांनी यावेळी दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी विद्यालयांना स्वत:चे पैसे खर्च करावे लागणार नसून त्यासाठी सरकार विद्यालयांना अनुदान देणार असल्याचे भट यांनी सांगितले.

आणखी ५० समुपदेशक
राज्यभरात ३०५ माध्यमिक विद्यालये व १०२ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. मात्र, ह्या ४०७ विद्यालयांसाठी (३०५ माध्यमिक व १०२ उच्च माध्यमिक) केवळ ४५ समुपदेशक आहेत. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी अपुरे पडत असून त्यामुळे आणखी ५० समुपदेशकांची भरती करण्यासाठी शिक्षण खात्याने यापूर्वीच जाहीरात दिली असल्याचे ते म्हणाले.
येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत ही पदे भरण्यात येणार असल्याचे भट यांनी सांगितले. सध्या जे समुपदेशक आहेत ते १०० विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे काम करीत आहेत. आणखी ५० समुपदेशक घेतल्यानंतर ते आणखी १५० विद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करतील. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी नंतर आणखी समुपदेशकांची भरती करावी लागणार असल्याचे भट यांनी सांगितले.