>> विठ्ठलापूर-साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील प्रकार
विठ्ठलापूर-साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास मारहाण केल्याची तक्रार डिचोली पोलिसात नोंदवण्यात आली असून, या प्रकरणी डिचोली पोलिसांनी सदर शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलापूर-साखळी येथील सरकारी प्राथमिक शाळेत हा प्रकार शनिवार 25 नोव्हेंबर रोजी घडला. शनिवारी सकाळी एका शिक्षिकेने मुलाला थप्पड मारल्याने त्याला दुखापत झाल्याचे मुलाच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
बाल कायद्याअंतर्गत पोलिसांनी विविध कलमांखाली शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार, सदर शिक्षिका पॅरा टीचर असून, आपण मुलाला मारहाण केलेली नाही, असा दावा शिक्षिकेने केला आहे. या संदर्भात तिने शाळा प्रमुखांसमोर तिने आपली बाजू स्पष्ट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाला सदर शिक्षिकेने मारल्यामुळे त्याचे डोके भिंतीच्या कडेला आपटल्याने मार लागल्याचा दावा मुलाच्या आईने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहित 323, बालहक्क कायद्याच्या कलम 8 (2) खाली गुन्हा नोंदवला असून, पोलीस तपास करीत आहेत.
विद्यार्थिनीस मारहाण; शिक्षिका ताब्यात
साखळी येथील एका हायस्कूलमधील आठवीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला 9 सप्टेंबर रोजी शिक्षिकने मारहाण केल्याने व ढकलून दिल्याने तिला दुखापत झाल्याच्या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी सदर हायस्कूलच्या संबंधित शिक्षिकेला ताब्यात घेतल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी 323, तसेच बालहक्क कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवल्यानंतर कसून तपास तसेच चौकशीअंती काल सदर शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणी मुलीच्या पालकांनी तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी प्रकरणी कसून तपास करून अखेर शिक्षकेस ताब्यात घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सदर मारहाण झालेली विद्यार्थिनी माशेल-तिवरे येथील आहे, तर ताब्यात घेण्यात आलेली शिक्षिका रेवोडा-बार्देश येथील आहे.
या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर, निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मारिया रिबेरो अधिक तपास करीत आहेत.