विद्यार्थ्यांसाठी दिनचर्या

0
18
  • डॉ. मनाली महेश पवार

आयुर्वेदशास्त्रात स्वस्थवृत्त आचरण सांगितले आहे. म्हणजेच दिनचर्या, रात्रीचर्या व ऋतूनुसार ऋतुचर्या. विद्यार्थ्याच्या म्हणा किंवा सगळ्यांच्याच स्वास्थ्यरक्षणासाठी किमान जेवढे शक्य आहे तेवढे ऋतूनुसार दिनचर्येचे आचरण-पालन अवश्य करावे.

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयू-आरोग्य लाभे,’ अशी शिकवण पूर्वी मुलांना दिली जायची. आज मात्र मुलं रात्री टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत उशिरा झोपतात आणि साहजिकच सकाळी लवकर उठणे होत नाही. शाळेत तर सकाळी लवकर जायचं असतं. बसगाडी तर ठरलेल्या वेळेवरच येते. आई बळेबळे रागवूनच मुलांना उठवते. मुलंही नंतर अर्धवट झोपेतून उठून घाईघाईत अर्धवट स्वच्छता करून, नाश्ता न करताच शाळा गाठतात. हे चित्र सर्रास 90 टक्के घरांमध्ये दिसून येत असेल. अशा या प्रकारच्या लाइफ स्टाइलने बरेच आजार अगदी कमी वयात उत्पन्न होत आहेत. सतत आजारी पडणे, सर्दी- ताप- खोकला- दमा, पोटात दुखणे, मलावरोध, त्वचेचे विकार, केसांचे विकार, लठ्ठपणा हे आजार तर विद्यार्थ्यांमध्ये सर्रास उद्भवत असतात. मुलांच्या खाण्या-पिण्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. व्यायाम नाही, दिवे लावणीच्या वेळी प्रार्थना नाही. यातूनच शारीरिक व मानसिक दौर्बल्य विद्यार्थ्यांमध्ये आलेले आहे.

आपली मुलं आपलं भविष्य आहे, देशाचं भवितव्य आहे, असे नुसते म्हणून उपयोग नाही. त्यासाठी हा जो आपला पाया आहे तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत असला पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदशास्त्रात स्वस्थवृत्त आचरण सांगितले आहे. म्हणजेच दिनचर्या, रात्रीचर्या व ऋतूनुसार ऋतुचर्या. विद्यार्थ्याच्या म्हणा किंवा सगळ्यांच्याच स्वास्थ्यरक्षणासाठी किमान जेवढे शक्य आहे तेवढे ऋतूनुसार दिनचर्येचे आचरण-पालन अवश्य करावे.

दिनचर्या म्हणजे काय?
दिनचर्या म्हणजे सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत करावयाच्या किंवा आचरण्याच्या कृती. आयुर्वेदशास्त्रानुसार सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाआधी साधारण दोन तास लवकर उठावे. विद्यार्थ्यांनी चार वाजता उठता येत नसेल तर किमान पाच वाजता दररोज उठावे. उठल्यावर अंथरुणात असतानाच तळहातावरील रेषा पाहाव्यात व ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती। करमुले तू गोविदम्‌‍ प्रभाते कर दर्शनम्‌‍॥’ हा श्लोक म्हणावा व त्यानंतर धरणीवर पाय टेकवताच धरणी मातेलाही वंदन करावे. हे आपले भारतीय संस्कार आहेत व ते प्रत्येकाने स्वतःमध्ये रुजवायला हवेत. काही नियम हे स्वतःच स्वतःला घालावे लागतात. पहाटेचा हा काल निसर्गतः सात्त्विक असतो. त्यामुळे शरीर, मन, इंद्रिये प्रसन्न असतात व हा काळ ईशचिंतनासाठी व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम असतो. या काळात मन एकाग्र होते व आकलनशक्ती वाढते.
ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे सांगत असताना रात्री किमान सहा तास झोप पूर्ण झालेली असावी, म्हणजेच रात्री जागरण करू नये.

मलविसर्जन
उठल्याबरोबर आपोआप मलविसर्जनाचा वेग येणे म्हणजेच शौचाला जाण्याची संवेदना उत्पन्न होणे हे उत्तम स्वास्थ्याचे लक्षण आहे. परंतु अनियमित सवयी, अयोग्य आहार इत्यादी कारणांमुळे हा वेग येत नाही. अशावेळी प्रथम दंतधावनविधी आटोपून नंतर वेग निर्माण होण्यासाठी एक पेला गरम पाणी प्यावे. मलविसर्जनानंतर गुदभाग स्वच्छ धुवावा. थंडीच्या दिवसांत कोमट पाणी वापरावे. हल्ली जो पाण्याचा स्प्रे वापरतात त्याचा दाब (फोर्स) जास्त नसावा. त्याने गुदभागी जखम होऊ शकते. पाश्चात्त्यांप्रमाणे टिश्यू, कापड यांचा वापर करू नये. साबण व पाण्याचाच वापर करावा.

हात-पाय धुणे
मलविसर्जनानंतर हात, पाय व तोंड स्वच्छ धुवावे. विशेषतः हात स्वच्छ साबणाने धुवावेत. एकाग्र चित्ताने तोंड, चेहरा, डोळे, नाक इत्यादी अवयव स्वच्छ करावेत. त्यासाठी वापरण्याचे पाणी हे कोमट व स्वच्छ असावे.

दंतधावन
दातांचे स्वास्थ्य नीट राहण्यासाठी मलविसर्जनानंतर दंतधावन करावे, म्हणजे आजच्या भाषेत ब्रश करावे. पूर्वी वड, खैर, कडुनिंब यांच्या फांदीची करंगुळीएवढी जाड व बारा अंगुली लांब काडी घेत. तिचे टोक दाताने चावत व त्या कुंचल्याने हिरड्यांना इजा न होईल अशा बेताने दात घासत व दातांच्या फटी साफ करत. त्रिफळा चूर्ण दातांना चोळत. दात घासताना खालच्या भागाचे दात प्रथम घासावेत. दंतधावनाने मुखाची दुर्गंधी, दात, जीभ व मुखातील मल नाहीसा होऊन मुख स्वच्छ होते व मुखाला रुची येते. सकाळी उठल्यानंतर, झोपण्यापूर्वी व प्रत्येक वेळच्या अन्नग्रहणानंतर दंतधावन व कवलधारण करून दात व मुख स्वच्छ करावे.

गण्डूष
औषधी द्रव्यांचे काढे किंवा स्नेह (तीळ तेल) तोंडात काही काळ धरून ठेवणे याला ‘गण्डूष’ (गुळणी) म्हणतात. मध्ये तोंडात द्रव इतका असावा की तो खुळखुळावून हलविता येऊ नये. गण्डुषामुळे ओठ फुटणे, खरखरीत होणे, दंतरोग, स्वरभेद यांपासून रक्षण होते.

कवलधारण
तोंडातील द्रव खुळखुळावता येईल इतका घेऊन त्याच्या चुळा भरणे याला ‘कवलधारण’ म्हणतात. खैर, वड, उंबर इत्यादी वृक्षांच्या सालींचा काढा करून त्याच्या गुळण्या करतात. अरुची, मुखदुर्गंधी, जास्त प्रमाणात तोंडात ताळ सुटणे यांचा नाश होऊन तोंडाला हलकेपणा येतो.

नस्य
नस्य म्हणजे नाकपुडीत तेल घालणे. सर्व ज्ञानेंद्रियांची व कर्मेंद्रियांची मुख्य केंद्रे मस्तिष्कामध्ये आहेत व त्यांच्यापर्यंत चिकित्सा पोहोचवण्याचे नाक हे द्वार असल्याने आयुर्वेदाने नस्यकर्माला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. नस्यासाठी तीळतेल वापरावे. हे तेल कोमट करून दोन-दोन थेंब दोन्ही नाकपुड्यांत सोडावे.
नस्य केल्याने त्वचा स्वच्छ होते. खांदे भरदार, छाती मजबूत, तेजस्वी कांती, मधुर स्वर, सुगंधित मुख व निर्मल इंद्रिये यांची प्राप्ती होते. त्वचेला सुरकुत्या, केस पिकणे, गळणे, चेहऱ्यावर वांग, डाग निर्माण होत नाहीत.

अभ्यंग
शरीराला तेलाचे मर्दन करणे या क्रियेला अभ्यंग म्हणतात. अभ्यंगासाठी वापरण्याचे तेल कोमट करून घ्यावे. अभ्यंग सर्वांगाला करावे. डोके व तळपायांना अवश्य करावे. तसेच कर्णपूरणही करावे. याने पायांना स्थैर्य येते, डोळ्यांना गारवा येतो व झोप शांत लागते. थकवा नष्ट होतो. अभ्यंगाने शरीर पुष्ट होते. त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, दृष्टी मंद होणे ही वार्धक्याची लक्षणे लवकर येत नाहीत. त्यामुळे अभ्यंग हे दिवाळी सणापुरती मर्यादित नसून आंघोळीच्या अगोदर रोज संपूर्ण अंगाला तेल लावावे.

व्यायाम
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम हलके-फुलके मनगट फिरवणे, हात फिरवणे, मान फिरवणे, कंबरेतून वाकणे इत्यादी वॉर्मअप व्यायाम करावेत व किमान 13 सूर्यनमस्कार होत घालावेत. सूर्यनमस्काराने सर्वांगाचा व्यायाम होतो. शरीराला हलकेपणा येतो, भूक वाढते, हालचाली सहज होतात. आळस नष्ट होतो, आरोग्य उत्तम राहते.

उद्वर्तन
व्यायामानंतर घामामुळे अंगाला आलेला चिकटपणा घालविण्यासाठी स्नानापूर्वी कषायरसात्मक व सुगंधी द्रव्यांच्या चूर्णाचे उटणे अंगाला चोळावे, त्याने त्वचा सतेज होते.

स्नान
स्नान केल्याने सकाळी-सकाळी शरीर-मन प्रसन्न होते. त्वचेवरील खाज, स्वेद नष्ट होऊन दाह, त्वचाविकारांचा नाश होतो. ऊर्जा व बल वाढून आयुष्याचे वर्धन होते. गळ्याखाली उष्ण जलाने व मानेच्या वर शीत जलाने स्नान करावे. शिरोभागी उष्ण जल वापरल्यास केस व डोळ्यांची शक्ती क्षीण होते. म्हणून नेहमी कोमट पाण्याने आंघोळ करावी व साबणाऐवजी उटणे वापरावे.

वंदन
स्नानादी कर्मे पार पाडल्यावर देवता, वडील माणसे यांना वंदन करावे. स्तोत्र, ध्यान, आत्मचिंतन यामध्ये सूर्योदयापर्यंत वेळ घालवावा. त्यातही शांतता असल्याने अभ्यासासाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

नाश्ता
सकाळी लवकर उठल्यापासून असा हा दिनचर्येचा क्रम ठेवल्यास विद्यार्थ्यांना नाश्ता करायलाही वेळ मिळतो. घाईगडबडीत किंवा न खाता शाळेत जाण्याची गरज नाही. नाश्त्यामध्ये शक्यतो पोळी-भाजी, विविध प्रकारच्या भाज्या घालून तयार केलेला उप्पीट-उपमा इत्यादी हा पोटभरीचा व पौष्टिक नाष्टा आहे. गूळ-शेंगदाणे, सुकामेवा हेही नाश्त्याला नक्की खावेत. व्यवस्थित नाश्ता केल्यावर मन प्रसन्न राहते. बल वाढते व पुढे शाळेत गेल्यावर अभ्यासावर पूर्ण लक्ष राहते.

तत्पश्चात विद्यार्थ्यांनी शाळेत जावे. शाळेतून आल्यावर हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन आपल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून भोजन मंत्र म्हणूनच जेवावे. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण हे नेहमी चौरस, सकस असावे. वामकुक्षी घेतल्यावर अध्ययन करून, थोडा वेळ खेळून, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी प्रार्थना करून रात्रीचे जेवण जेवावे. संध्याकाळी चहाच्या वेळी फास्टफूड, जंकफूड पूर्ण टाळावे.
अशा प्रकारे पूर्ण दिवसाचा चर्येचे पालन केल्यास विद्यार्थी कधीच आजारी पडणार नाहीत. मुलांचे आरोग्य टिकून राहील व शिक्षणातही प्रगती होईल.