विद्यार्थिनी मारहाणप्रकरणातील संबंधितांवर कारवाई करणार : झिंगडे

0
5

कुंकळ्ळी येथील एका विद्यालयाच्या प्रांगणात काही विद्यार्थ्यांकडून झालेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या व सध्या गोमेकॉत उपचार घेणाऱ्या विद्यार्थिनीला नेमकी कुणी मारहाण केली होती व त्यावेळी शिक्षकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली या प्रकरणी राज्य शिक्षण खात्याने सविस्तर अहवाल तयार केला आहे. या प्रकरणी जे जबाबदार असल्याचे दिसून येतील व ज्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा जीव संकटात सापडला त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती काल शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली.

पोलीस स्थानकात तक्रार
या प्रकरणी शिक्षण खाते तसेच संबंधित विद्यालयाकडे अद्याप कुणीही अधिकृतरित्या तक्रार नोंदवलेली नाही. मात्र, या घटनेसंबंधी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असल्याची माहितीही झिंगडे यांनी दिली. शिक्षण खात्याला या घटनेची माहिती समाजमाध्यमांवरून मिळाली असल्याचे ते म्हणाले. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाला यासंबंधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासून पाहण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे ते म्हणाले. या शाळेतील शिक्षकांची नियुक्तीही शाळा व्यवस्थापनाने केलेली आहे. तसेच शिस्तभंगासंबंधीची कारवाईही शाळा व्यवस्थापनालाच करावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी पुढील निर्णय घेण्यापूर्वी शिक्षण खात्याला दोन्ही पक्षकारांना विश्वासात घ्यावे लागणार असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.