फोंडा तालुक्यातील एका शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगाचे प्रकरण उघडकीस आले असून, म्हार्दोळ पोलिसांनी त्या विद्यालयातील एका शारीरिक शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल काल केला. सदर पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकाराबाबत पोलिसांना सविस्तर माहिती दिली असून, प्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना महिनाभरापूर्वी घडली होती. पीडित मुलीने त्या शिक्षकाच्या विरोधात शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती; मात्र त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप आहे. याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर त्या शिक्षकाला काही दिवसांसाठी निलंबित केले होते. तसेच त्याला सहा दिवस हजेरीपटावर स्वाक्षरी करण्यापासून रोखण्यात आले होते; परंतु राजकीय दबावामुळे तो शिक्षक पुन्हा सेवेत रुजू झाला. तसेच त्या मुलीला धमकी देऊ लागला, असा आरोप केला जात आहे.