विद्याकलाधिपतये नमः

0
12
  • मीना समुद्र

श्रीगणेशालाच हा मान का मिळाला? तर गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिष्ठाता देव आहे. त्याला या साऱ्या विद्या आणि कला अवगत आहेत. गणेश आराधनेने विद्येची प्राप्ती होते, कला साध्य होतात. यासाठी त्याचा वरदहस्त आपल्या माथ्यावर राहावा म्हणून प्रयत्न करणे आवश्यक.

श्रीगणेश हा ॐकाररूप अक्षरब्रह्माचे मूर्तस्वरूप. तो प्रथमेश म्हणून त्याचे वंदन आणि स्तवन प्रत्येक लहानमोठ्या प्रसंगी कार्यारंभी केले जाते. त्यामागे कोणतेही संकट-विघ्न न येवो अशी इच्छा असते. शिवाय गणेश ही विद्येची, ज्ञानाची देवता. म्हणून विद्यारंभ करताना आपण ‘श्रीगणेशाय नमः’ ही अक्षरे प्रथम गिरवायला शिकतो. आणि सकाळी 9 म्हणजे दिवसाच्या आणि आपल्या कामाच्या प्रारंभी त्याला हात जोडून प्रार्थना करतो आणि त्या विद्येच्या दयासागराला, त्या आराध्य मोरेश्वराला ‘अज्ञानत्व हरोनि बुद्धिमती दे’ अशी विनंती करतो.

भारतीय संस्कृतीत ज्ञानाला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यामुळेच ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ असे आपले घोषवाक्य आणि ब्रीद असते. हे ज्ञान या श्रीगणेशाच्या उपासनेने आपल्याला प्राप्त होते. 33 कोटी देव असताना श्रीगणेशालाच हा मान का मिळाला किंवा त्याचीच उपासना करण्याचे कारण काय? – तर गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिष्ठाता देव आहे. त्याला या साऱ्या विद्या आणि कला अवगत आहेत. फार प्राचीनकाळापासून आपली ही ठाम समजूत आणि श्रद्धा, तसेच विश्वासही आहे की गणेश आराधनेने विद्येची प्राप्ती होते, कला साध्य होतात. यासाठी त्याचा वरदहस्त आपल्या माथ्यावर राहावा म्हणून प्रयत्न करणे आवश्यक, हे आपल्या सनातन धर्मातील प्राचीन शिक्षणपद्धतीने सिद्ध झालेले आहे. ती अतिशय सखोल आणि अनुभवसमृद्ध अशी ज्ञान देणारी आणि सर्वांगीण विकास साधणारी पद्धती आहे, जिच्यात अनेक कला समाविष्ट आहेत. मनुष्यजीवनात ठायी-ठायी उपयोगी सिद्ध होणाऱ्या या विद्या आणि कला आपल्याला ज्ञानविज्ञानाबरोबरच इहलौकिक ते पारलौकिक ज्ञान देतात. विकासाच्या मार्गावर- प्रगतिपथावर कशी वाटचाल करावी आणि ती केल्याने कोणते फळ आपल्याला प्राप्त होते हेही त्या ज्ञानामुळे आपल्याला कळून येते. कच्च्या मडक्याला पक्के बनविण्यासाठी, मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी आणि त्यात प्राण फुंकण्यासाठी या विद्या आणि कलांचा अत्यंत उपयोग होतो. लौकिकात चरितार्थासाठी उपयोग होत असला तरी स्वर्गीय आनंद, उच्च ध्येयप्राप्ती, संकल्पसिद्धी आणि त्याचे साफल्य मिळाल्याने मनाला होणारा संतोष हे पारलौकिकाच्या वाटेने नेतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या व्यक्तीसापेक्ष अशी विद्या आणि कला निवडत असली तरी त्याच्या निष्ठेनुसार, सातत्यानुसार आणि अभ्यासानुसार त्याचे फळ मिळते, हे मात्र नक्की!
आता या चौदा विद्या कोणत्या? तर ऋग्‌‍, यजुः, साम आणि अथर्व हे चार वेद. वेद म्हणजेच ज्ञान. ऋग्वेदात मंत्रविषयक ज्ञान आहे, यजुर्वेदात आत्मज्ञानाविषयी माहिती असते, सामवेदात गायन म्हणजे गीत-संगीत व अथर्व वेदात विज्ञान, खगोल, गणिताविषयीची माहिती असते.

चार वेदांप्रमाणेच सहा वेदांगांचे ज्ञान आणि त्याविषयक माहिती आपल्याला होते. या वेदांच्या उपांगात व्याकरण म्हणजे भाषेतील शब्दव्यवहाराचे ज्ञान देणारे पहिले, दुसरे ज्योतिष म्हणजे खगोलशास्त्र आणि सामुद्रिकशास्त्राचे ज्ञान, तिसरे निरुक्त म्हणजे वैदांतील कठीण शब्दांचे अर्थ, चौथे उपांग-कल्‌‍प यामध्ये धार्मिक विधींची माहिती असते, पाचवे वेदांग म्हणजे छंद- ज्यात गानयोग्य रचनांची माहिती दिली जाते आणि सहावे उपांग आहे शिक्षा. म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अशा सर्व मिळून 14 विद्या आहेत. याशिवाय जीवनाला चार चाँद लावणाऱ्या आणि त्यात अधिक रस आणि रंग भरणाऱ्या जीवनोपयोगी अशा 64 कला आहेत-

  1. पानक रस म्हणजे मदिरा, आसव, पेय तयार करणे. 2. धातुवाद- यात कच्चे-पक्के धातू, मिश्रधातू वेगळे करता येतात. 3. दुर्वाच योग म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ. 4. आकर ज्ञान- खाणींविषयी सखोल माहिती. 5. वृक्षायुर्वेद योग- उपवन, उद्यान, कुंज कसे तयार करावे, काळजी कशी घ्यावी, निगा कशी राखावी याचे ज्ञान. 6. पट्टिका वेत्रवाणकल्प- यात सुंभ, वेल, नवार यांपासून खाट कशी विणावी ते सांगितलेले असते. 7. वैनायिकी विद्याज्ञान- विनायक या शब्दावरून विशेषण झाल्यासारखा हा शब्द शिष्टाचार आणि विनय शिकवतो. 8. व्यायामिकी विद्याज्ञान- शास्त्रोक्त व्यायाम, 9. वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय, 10. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे. हिलाच मारुती चितमपल्लींच्या पुस्तकात निळावंतीची भाषा असे म्हटले आहे. 11. अभिधान कोष- शब्द आणि छंद यांचे ज्ञान, 12. वास्तुविद्या- भवन, सदन, राजवाडे, महाल कसे बांधावे याची माहिती. 13. बालक्रीडाकर्म- बालकांचे मनोरंजन कसे करावे. 14. चित्रशब्दापूपभक्षविपाक क्रिया- एवढे मोठे नाव असलेली कला म्हणजे स्वयंपाक, पाकक्रियाविषयक ज्ञान. 15. पुस्तकवाचन- कोणते ग्रंथ कसे, केव्हा वाचावे. 16. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे. 17. कौचुमार योग- कुरुपाला सुरूप बनविणे. 18. हस्तलाघव- हातांनी केलेली कामे. 19. प्रहेलिका- कोट्या, उखाणे, काव्यातून प्रश्नोत्तरे शोधताना बुद्धीचा कस. 20. प्रतिमाला- अंत्याक्षरे. 21. काव्यसमस्यापूर्ती- काही ओळींवरून काव्य पूर्ण करणे. 22. भाषाज्ञान- देशीविदेशी भाषांचे ज्ञान. 23. चित्रयोग- चित्रे काढून रंगविणे. 24. कायाकल्प- वृद्ध माणसांना तरुण बनवणे. 25. माल्यग्रंथ विकल्प- वस्त्रप्रावरणांची योग्य निवड. ही ऋतूनुसार, प्रकृतीनुसार करावी लागते. रंगसंगती, पोतही पाहावा लागतो. 26. गंधयुक्ती- सुवासिक गंध व लेप तयार करणे. 27. यंत्रमातृका- यंत्रांची निर्मिती करणे. 28. अत्तर विकल्प- फुलांपासून अत्तरे बनविणे. 29. संपाठय- दुसऱ्याचे ऐकून पाठ करणे. 30. धारण मातृका- स्मरणशक्ती वाढवणे. 31. छालीक योग- चलाखी, फसवणे. 32. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे. 33. मणिभूमिका- भूमीवर मण्यांची रचना करणे. 34. द्यूतक्रीडा- जुगार खेळणे, 35. पुष्पशकटिकानिमित्त ज्ञान- प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे. 36. माल्यग्रथन- हार, पुष्पमाला गुंफणे. 37. मणिरागज्ञान- वेगवेगळी रत्ने, त्यांचे रंग, त्यांचा विशिष्ट प्रभाव यांचा अभ्यास. 38. मेषकुक्कुटलावक- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी. 39. विशेषकच्छेद ज्ञान- भाळावरच्या तिलकासाठी साचे तयार करणे. 40. क्रिया विकल्प- वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटवणे. 41. मानसी काव्यक्रिया- शीघ्र कवित्व. 42. आभूषण भोजन- सोन्याचांदी-रत्नामोत्यांनी शरीर सजविणे. 43. केशशेखर पीड ज्ञान- मुकुट बनवणे, केसांत फुले माळणे. 44. नृत्यज्ञान- नाचाविषयीचे सखोल ज्ञान. 45. गीतज्ञान- गायनशास्त्राचे सखोल ज्ञान. 46. तंडुल कुसुमावली विकार- तांदूळ व फुलांची रांगोळी. 47 केशमार्जन कौशल्य- मस्तकाला तेलाने मालीश करणे. 48. उत्सादन क्रिया- अंगाला तेलाने मर्दन करणे. 49. कर्णपत्र भंग- पानाफुलांची कर्णफुले. 50. नेपथ्य योग- ऋतूनुसार वस्त्रालंकार निवड. 51. उदकघात- जलविहार, रंगीत पाण्याच्या पिचकाऱ्या. 52. उदकवाद्य- जलतरंग वाजविणे. 53. शयनरचना- मंचक, शय्या व मंदिर सजविणे. 54. चित्रकला- चित्रे, नक्षी काढणे. 55. पुष्पास्तरण- फुलांची कलात्मक शय्या करणे. 56. नाट्यअख्यायिका दर्शन- अभिनय. 57. दशनवसनांगरात- दात, वस्त्रे, काया रंगवणे. 58. तुर्ककर्म- चरखा व टकळीने सूत काढणे. 59. इंद्रजाल- गारुड व जादुटोणा. 60. तक्षणकर्म- लाकडावर कोरीवकाम. 61. अक्षर मुष्टिका कथन- करपल्लवीने संभाषण करणे. 62. सूत्र तथा सूचीकर्म- वस्त्राला रफू करणे. 63. म्लेंछितकला विकल्प- परकीय भाषाज्ञान. 64. रत्नरौप्य परीक्षा- अमूल्य रत्ने व धातूंची पारख करणे.

या कला काही कष्टसाध्य आणि काही सहजसोप्या असतात. अशा या चौसष्ठ कला या आपल्या व्यक्तित्वविकासासाठी आणि आपले सर्वांगीण जीवन समृद्ध करण्यासाठी आवश्यक. श्रीगणेशाला त्या अवगत होत्या. तशाच आपणही निदान आपल्याला आवश्यक त्या साध्य केल्या पाहिजेत आणि त्यापासून मिळणारा ब्रह्मानंदसदृश आनंद मिळविला पाहिजे. शिल्प-चित्र-नाट्य-संगीतकला या सर्वसामान्यपणे सर्वत्र दिसतात तसे कथन किंवा वक्तृत्वही! यांत्रिक आणि तांत्रिक ज्ञान असे कालामानाप्रमाणे बदलत जाणारे ज्ञान आणि त्यामागचे शास्त्र जाणून घेणे म्हणजे बुद्धीला तेज चढविणे, जीवनसाफल्य मिळविणे. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अतिपधी श्रीगणेश आपल्याला याचीच आठवण दरवर्षी करून देत असतो आणि त्याच्या आगमनाप्रीत्यर्थ जनातून आणि मनातून ‘गणपती बाप्पा मोरया- मंगलमूर्ती मोरया’चा घोष घुमत असतो.