विद्यमान भारतीय हॉकी संघाला टोकियोमध्ये पदक जिंकण्याची संधी

0
154

>> माजी कर्णधार सरदारने व्यक्त केले मत

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील विद्यमान भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी असल्याचे मत माजी कर्णधार सरदार सिंगने व्यक्त केले.

सरदार सिंगच्या मते गेल्या चार दशकांतील ऑलिम्पिकमधील हॉकी पदकाचा दुष्काळ विद्यमान भारतीय संघ संपवू शकतो. विद्यमान भारतीय संघ सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला असेल आणि त्याचाच फायदा त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना निश्‍चितच होईल, असे सरकार म्हणाला.

भारतीय संघाचा भारतीय संघाचा ऑलिम्पिक इतिहास समृद्ध असून त्याने अभूतपूर्व आठ सुवर्णपदकांशिवाय रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय हॉकी संघाने शेवटचे यश ४० वर्षांपूर्वी १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये मिळवले होते.
भारतीय हॉकीच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार असलेल्या पिढीचा भाग असल्याचा त्याला अभिमान असल्याचे माजी कर्णधार सरदार सिंगने सांगितले. परंतु त्याच्या कारकिर्दीत आपल्या ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालता आली नाही हा एकमेव खेद असल्याचे त्याने सांगितले.

सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने २०१४साली पाकिस्तानला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले होते. २०१८साली त्याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी भारतीय संघ ६व्या स्थानापर्यंत पोहोचला होता. ३१३ आंतरराष्ट्रीय सामने खेळूनही घरी भिंतीवर ऑलिम्पिक पदक लटकवू शकलो नाही ही खंत कायम राहील, असे सरदारने सांगितले.

विद्यमान भारतीय हॉकी संघाने गेल्या काही वर्षात आपली क्षमता वाढवलेली आणि ज्या प्रमाणे ते या वर्षाच्या प्रारंभी एफआयएच हॉकी प्रो लीग स्पर्धेत खेळले, ते पाहता या संघात ऑलिम्पिक पदक मिळविण्याची मोठी आशा आहे.

कोविड-१९ मुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलली गेली आहे. परंतु त्याचा फायदा भारतीय संघाला काही क्षेत्रावर काम करण्यावर व नवीन प्रतिभांचा शोध घेण्यासाठी निश्‍चितच होईल, असे सरदारला वाटते.

राजकुमार, दिलप्रीत, विवेक सागर, गुरसाहिबजीत या उभरत्या प्रतिभावंत खेळाडूंना पारखण्याची संधी आता मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना आहे. प्रो-लीगमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. कोविड-१९मुळे उद्भवलेल्या जागतिक आरोग्य संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय पुरुष व महिला हॉकी खेळाडूंनी लक्ष गमावू नये असा सल्ला ३४ वर्षीय सरदारने दिला. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खेळणे हा प्रत्येक ऍथलिटसाठी सर्वांत प्रेरक घटक ठरावा आणि त्यांनी टोकियोमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावेत, असेही सरदारने सांगितले.

गेल्या दशकभरातील माझ्या कारकिर्दीकडे पाहिले तर आम्ही काही अविस्मरणीय सामने खेळलो आहोत. २०१४च्या आशियाई खेळांतील १६ वर्षांतील प्रथम सुवर्णपदक हे केवळ ऐतिहासिकच नव्हे पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करणे हा माझ्यासाठी आठवणीतील मोठा ठेवा आहे, असे सरदार म्हणाला.