विदेश दौऱ्यावरून परतलेल्या खासदारांच्या 7 शिष्टमंडळांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

0
3

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे लाख प्रयत्न केले होते. भारतीय सैन्य दलांनी मिळून पाकिस्तानचे तुर्की आणि चीनने दिलेले ड्रोन व मिसाईल हवेतच नष्ट केले होते. यानंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा टराटरा फाडण्यासाठी जगभरात खासदारांची 7 शिष्टमंडळे पाठविली होती. सर्वपक्षीय खासदारांचा त्यात समावेश होता. हे खासदार आपली कामगिरी फत्ते करून मायदेशात परतले आहेत. या खासदारांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत या मोहिमेबद्दल वृत्तांत दिला.
या शिष्टमंडळात भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, टीएमसी, जदयू, शिवसेना (शिंदे गट) आणि अन्य काही पक्षांचे खासदार देखील होते. या खासदारांनी वेगवेगळ्या देशांत जात त्यांच्या राजधानीमध्ये पाकिस्तानने जन्माला घातलेला दहशतवाद आणि भारताची भूमिका मांडली. या शिष्टमंडळांनी काल मोदींना आपापले अनुभव सांगितले.

7 शिष्टमंडळामध्ये 50 खासदार होते. तसेच त्यात 8 राजदूतांचा समावेश होता. त्यांनी 33 देशांच्या राजधानी आणि युरोपीय संघाचा दौरा केला. मोठ्या ताकदीने भारताने आपली बाजू जगासमोर मांडली. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग होता आणि तो कमालीचा यशस्वी झाला. पाकिस्तानला साथ देणाऱ्या देशालाही त्यांचे म्हणणे मागे घ्यावे लागले आहे.

सातपैकी चार शिष्टमंडळांचे नेतृत्व सत्ताधारी एनडीएने, तर तीन शिष्टमंडळांचे नेतृत्व विरोधकांनी केले होते. देशात कितीही विरोधात असले तरी सर्वजणांनी जगात एकी दाखविली आणि पाकिस्तानची झोप उडविली. भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जद(यू)चे संजय झा, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, द्रमुकच्या कनिमोळी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या सुप्रिया सुळे यांनी आपापल्या शिष्टमंडळांचे नेतृत्व केले.