>> वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती
मुरगाव बंदरातील विदेशी पर्यटकांशी गैरवर्तन प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली असून, दोन टूरिस्ट टॅक्सीचालकांबाबत अहवाल प्राप्त झाला आहे.
त्यांचे परवाने निलंबित करून लवकरच त्यांची चौकशी केली जाणार आहे. या गैरवर्तन प्रकरणात गुंतलेल्या आणखीन काही टॅक्सीचालकांच्या विरोधात आवश्यक पुरावे आढळून आल्यास त्यांच्या विरोधातही कारवाई करून परवाने निलंबित करण्यात येतील, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुरगाव बंदरातील विदेशी पर्यटकांशी गैरवर्तनाच्या प्रकरणामुळे गोव्याच्या प्रतिमेला जागतिक पातळीवर तडा गेला आहे. यासारख्या गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात गुंतलेल्या टूरिस्ट टॅक्सीचालक-मालकांचा परवाना कायमचा रद्द केला जाणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला आहे. टॅक्सीचालकांना राजकीय पाठिंबा मिळत असला, तरी त्याचा कारवाईत कोणताही अडथळा येणार नाही, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत गोवा टॅक्सी ऍपच्या विषयावर सविस्तर चर्चा होईल. टूरिस्ट टॅक्सींसाठी हा ऍप तयार केला आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वांवर हा ऍप चालविण्यात येणार आहे. या ऍपच्या माध्यमातून वेलफेअर फंड तयार केला जाईल आणि तो टॅक्सीचालकांच्या हितार्थ वापरला जाईल, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.