विदेशातून आलेले दोन संशयित कोरोना रुग्ण गोमेकॉत दाखल

0
154

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात दोन कोरोना संशयास्पद रुग्णांना बुधवारी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

कोरोनाच्या संशयावरून दाखल दोघेही स्थानिक आहेत. गेले काही महिने त्यांचे विदेशात वास्तव्य होते. वास्को येथील एका २७ वर्षीय युवक आणि साखळीतील २३ वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वास्कोतील सदर युवक एका बोटीवर काम करीत होता. ही बोट जून २०१९ मध्ये गोव्यातून रवाना झाली होती. ही बोट युरोप, फिनलॅण्ड या भागातून इटली येथे गेली होती. या युवकाचा फेब्रुवारी २०२० मध्ये बोटीवर कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला होता. गोव्यात आल्यानंतर दोन दिवसांनी युवकाला ताप व खोकला सुरू झाला आहे. त्यामुळे त्याला गोमेकॉच्या कोरोना खास वॉर्डात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मूळची साखळी येथील सदर महिला ३० नोव्हेंबर २०१९ पासून दुबई येथे राहत होती. सदर महिला गेल्या ८ मार्च २०२० रोजी एअर इंडियाच्या विमानाने गोव्यात परतली होती. सदर महिलेला कालपासून ताप, खोकला सुरू झाला आहे. खास वॉर्डात दाखल दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राणे यांनी दिली.

विषाणूशास्त्र प्रयोगशाळा
सुरू करण्यावर विचार
दरम्यान, गोव्यात विषाणूशास्त्र प्रयोगशाळा सुरू करण्यावर विचार केला जात आहे. गोव्यात विषाणूशास्त्र प्रयोगशाळा नसल्याने कोरोना संशयास्पद व्यक्तीच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागत आहेत. ही सुविधा गोव्यात उपलब्ध झाल्यास जलद गतीने उपचार करण्यासाठी लाभदायक ठरणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारी कार्यालये, हॉस्पिटल, विद्यालय, महाविद्यालयांत आवश्यक सुरक्षा उपाय योजना राबविण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

बायोमेट्रिक हजेरी पद्धत
३१ मार्चपर्यंत स्थगित

राज्य सरकारने सरकारी कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी पद्धत ३१ मार्च २०२० पर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना हजेरीपटावर सहीची सूचना करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर बायोमेट्रिक हजेरी पद्धत स्थगित ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासन विभागाचे अवर सचिव (जीए -१) श्रीपाद आर्लेकर यांनी यासंबंधीचा आदेश काल जारी केला.