विदेशी जहाजांवर काम करणार्या सुमारे ८ ते १० हजार गोमंतकीयांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती काल केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
विदेशातून सध्या भारतात विमाने येत नसून या पार्श्वभूमीवर या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी विशेष विमाने पाठवावी लागणार आहेत. हे ८ ते १० हजार गोमंतकीय एकाच देशात काम करीत नसून ते वेगवेगळ्या देशांच्या जहाजांवर काम करीत आहेत. कोरोनाच्या आपत्तीमुळे ही जहाजे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत. या संकटाच्या प्रसंगी काही जहाजांच्या कंपन्यांनीही आपल्या जहाजांकडे दुर्लक्ष केल्याने त्यावर काम करणार्या कर्मचार्यांची स्थिती बिकट झाली आहे. या परिस्थितीत कुठल्या जहाजावर किती गोमंतकीय आहेत व या घडीला त्यांचे जहाज कुठे आहे ही सगळी माहिती मिळवून त्यांना परत आणण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारला पेलावे लागणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
पंतप्रधानांशी बोलणी
या गंभीर प्रश्नाबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडेही बोलणी केली असल्याची माहिती नाईक यांनी दिली. विदेशी जहाजांवर काम करणार्या या गोमंतकीयांना गोव्यात आणण्याची व्यवस्था केली जावी अशी मागणी करणारे एक निवेदन त्यांच्या कुटुंबियांकडून आपणाला देण्यात आले असल्याचे नाईक म्हणाले. या गोमंतकीय बांधवांविषयी आपणालाही चिंता असून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्याबाबत चर्चा केली असून त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.