विदेशांमध्ये खाती असलेल्या ४२७ जणांची ओळख पटली असून त्यापैकी २५० जणांनी तशी कबुली दिली आहे, असे निवेदन काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत केले. काळा पैसा देशात परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न योग्य प्रकारे सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या निवेदनाने समाधान न झालेल्या विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.विरोधकांच्या मागणीनुसार काल राज्यसभेत काळ्या पैशावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना जेटली म्हणाले की सरकार काळ्या पैशाचा पाठलाग सक्रीयरीत्या करील व शेवटच्या खात्याची ओळख पटेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. कॉंग्रेसने यावेळी सरकारवर टीकेची झोड उठवताना लोकांना खोटे सांगू नका असा इशारा दिला.
राज्यसभेत निवेदन करताना काळा पैसेवाल्यांची नावे जाहीर करायची की नाही हा मुद्दा नसून केव्हा व कशी जाहीर करायची हा मुद्दा आहे असे जेटली यांनी सांगितले. काळ्या पैशासंदर्भातील पुरावे देशाबाहेर असल्याने सरकारला आधी त्यासंबंधीचे पुरावे गोळा करावे लागतील. त्यासाठी सरकारने विविध देशांशी केलेल्या करारांचा आधार घ्यावा लागेल असे जेटली यांनी सांगितले. नावे जाहीर केली जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. योग्य प्रक्रियांचे पालन न करता नावे जाहीर केली तर त्याचा फायदा खातेदारांना मिळेल असे ते म्हणाले.
परदेशात खाते असलेल्यांची जी ६२७ नावे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेली आहेत, त्यापैकी ४२७ जणांची ओळख पटल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५० जणांनी असे खाते असल्याची कबुली दिल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी सरकार सत्तारूढ झाल्यावर पहिले काम कुठले केले असेल तर काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले याची जेटली यांनी आठवण करून दिली.