![Vijay Hazare Trophy Final match in Bengaluru](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/20hazare.jpg)
बेंगळुरू
आदित्य तरेच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीवर ४ गडी राखून विजय मिळवित मुंबईने तिसर्यांदा विजय हजारे चषकावर नाव कोरले. बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. मुंबईने यापूर्वी २००६-०७मध्ये राजस्थानवर मात करीत या चषकावर शेवटचे नाव कोरले होते.
दिल्लीकडून मिळालेल्या १७८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ (८), अजिंक्य रहाणे (१०), श्रेयस अय्यर (७) आणि सूर्यकुमार यादव (४) हे झटपट तंबूत परतल्याने मुंबईची स्थिती एकवेळ ४ बाद ४० अशी बिकट झाली होती. परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज अजिंक्य तरे आणि सिद्धेश लाड यांनी पाचव्या विकेटसाठी १०१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत संघाला विजयासमिप नेले. तरे १३ चौकार व १ षट्कारानिशी ८९ चेंडूत ७१ धावांची अर्धशतकी खेळी करून परतला. तर सिद्धेश लाडने ४ चौकार व २ षट्कारांनिशी ६८ चेंडूत ४८ धावांचे योगदान दिले. शेवटी शिवम दुबेने १९ धावांची नाबाद खेळी करीत मुंबईचा विजय साकारतानाच संघाला तिसर्यांदा विजय हजारे चषक मिळवून दिला. दिल्लीतर्फे कुलवंत खेज्रोलियाने ३ तर सुबोध भाटी व ललित यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वीमुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि शिवम दुबे व धवल कुलकर्णी यांच्या धारदार द्रुतगती गोलंदाजीमुळे दिल्लीचा डाव ४५.४ षट्कांत १७७ धावांवर संपुष्टात आणला. दिल्लीतर्फे हिम्मत सिंगने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. ध्रुव शोरीने ३१, सुबोथ भाटीने २५, पवन नेगीने २१, नितिश राणाने १३ तर उन्मुक्त चंदला १३ धावांचे योगदान देता आलेे. मुंबईतर्फे धवल कुलकर्णी व शिवम दुबे यांनी प्रत्येकी ३ तर तुषार देशपांडेने २ गडी बाद केले.