- डॉ. अनुजा जोशी
ती.. तशीच वेगाने पुढे गेली.. भयंकर ‘दुर्गावतार’ धारण केला.
आणि विलक्षण ऊर्जेच्या अवसरात
तिने ह्या माजलेल्या महिषबुद्धी असूराला थेट ठार केले!
स्वतःच्या व इतरांच्या आयुष्याचे
हिरवेगार सोने करून सुख लुटून देणारी
पुराणातली ही एक ‘विजया’, ‘देवी’ बनून गेली.
– आज प्रत्येक ‘देवी’ने ‘असे विजयी’ व्हायला हवे आहे!!
पहिल्या पावसात ती बाळरूपात होती
कोवळ्या अंकुरांच्या बाळमुठी चोखत
आभाळाकडे टुकुटुकु बघत होती
मग रांगू लागली
थेंबांतून टपटपू लागली
झर्यांतून धावू लागली
पानाफुलांवर नाचू लागली
सृष्टीला ओलं हिरवं बाळसं आलं
सृष्टी हिरवी होऊन सजू लागली
मग यथावकाश श्रावणाच्या पिवळ्या उन्हाची हळद
सृष्टीच्या अंगाला लागली
आणि न्हातीधुती ही लेक
हिरवी लेणी लेऊन
निळ्यासावळ्या नक्षत्रांच्या मांडवाखाली
नववधू बनली
वाजतगाजत घरी आली
भाद्रपदात गौरा‘बाई’ बनली
रांधू लागली नांदू लागली
घरादारात शेतात भर्जरी उन्हात राबू लागली..
‘‘भर्जरी उन्हाचा घुमट – उरात हिरवे सावट
लागली पानांना चाहूल – वार्याचे पुढचे पाऊल!
शरद ऋतूचा डोलारा – भरला उन्हाने गाभारा
पिवळ्या उन्हाचे मखर – सृष्टीला डोहाळे प्रखर!’’
आणि आता पेढे! खरंच,
सृष्टीला दिवस गेलेत
हो! सृष्टीचे हिरवे कोवळे दिवस गेले
आणि परिपक्व भरलेले पिवळे दिवस आले
हिरवी शेतं पिवळी झाली
सृष्टी रसरसली
कणसाकणसात टचटचून दाणा भरला
‘पोटुशी’ सृष्टी जडावून तृप्त झाली
दाणा पिकला. धान्य तयार झालं.
आपलं ‘अन्न’ तयार झालं!
हिरवी लडिवाळ नाचणारी सृष्टी
आता केवढी मोठी – मॅच्युअर झाली! इतकी की-
तिने आपल्या पोटापाण्याचीही सगळी व्यवस्था
आता केली आहे.
दाण्यादाण्याला आपल्या उदरात रुजवून
वाढवून पाळून पोशून
पक्वतेचे संस्कार करून
सृष्टीने आमचं अन्न आता आमच्यासमोर ठेवलं आहे
आमचं ताट वाढून ठेवलं आहे!
भरलं ताट समोर ठेवणारी ही सृष्टी
आमची जन्मदात्री- धात्री- जननी
हीच नंदिनी सखी भगिनी कामिनी आणि गृहिणीसुद्धा
हीच माती, हीच शेती, ही नदी आणि मादीसुद्धा!
या सगळ्या रूपात ‘ती’ एकच आहे
सगळ्या रूपात प्रचंड ऊर्जेने ‘ती’ कार्यरत आहे
ती रुजवते धारण करते वाढवते आहे
फुलवते पिकवते आहे
ती रांधते आणि आयुष्ये सांधते आहे!
केवढ्या ऊर्जेने ती सगळं चालवते आहे.
ती साक्षात एनर्जी- शक्तीचा साठा आहे
त्यापेक्षा ‘ती’ म्हणजे ‘ऊर्जाभरला घट’च आहे, असं म्हटलं तर?
हो! ऊर्जेचा घटच
या ऊर्जाघटाचा बांधा किती सुडौल कमनीय
मान लचकेदार उंच, कंबर गोल मोहक
आणि सृजनप्रक्रियेसाठीच की काय
केवढा ‘सुघटित’ बनलेला सुंदर घटाकार देह!
या घटामध्ये आणखी लहान लहान ऊर्जेचे घट सामावलेले
कटीघटामध्ये तर एक विलक्षण घट – गर्भाशय!
मुठीएवढाच; पण नऊ महिन्यांचा जीव मावू शकेल एवढी
प्रचंड इलॅस्टिसिटी असणारा
वैशिष्ट्य व चमत्कृतीपूर्ण
या गर्भघटातून बाहेर आल्यानंतर
बाळाच्या पोषणाची जबाबदारी पुन्हा
वात्सल्याच्या दुधाने भरलेल्या दोन अमृतकुंभांचीच
ते तर साक्षात ‘प्राणपोषक’ घडे
असे सगळे घडे सगळ्या जबाबदार्या निभावण्यासाठी पक्के तयार
पण मनाचा घडा मात्र नेहमीच मृदू ओला हळवा
आतल्या पाण्याचा थांगपत्ता लागू न देणारा..
म्हणूनच या गूढ मनाच्या घटातले पाणी
दोन दिवल्यांमधून – तिच्या दोन डोळ्यांमधून
निरंतर तेवत राहणारे
तिचे अवघे वात्सल्य प्रेम ममत्व
दोन पाणीदार डोळ्यांमधून अखंड पाझरणारे..
हो, अजून एक खूप महत्त्वाचं- मोलाचं- ते म्हणजे
मातीचा हा घडा एकही छिद्र नसलेला, एकही तडा नसलेला
‘अभंग’ चारित्र्याचा हवा!
आत तुडुंब भरलेली ऊर्जा अखंड टिकून राहण्यासाठी!
हे सगळे कमी पडते म्हणूनच की काय
आणखीही काही तिच्या शिरावर येऊन बसलेले- तिच्या ‘घटी बसलेले!’
कमरेच्या घटावर
कधी पाण्याने भरलेला घडा
कधी हसरे रडके बाळ
तर कधी नाईलाजांची बोचकी ढाचकी
आणि डोईवर कर्तव्यांचे घडे एकावर एक ठेवून
ती युगानुयुगे वाट चालत असलेली,
अखंड पाणी भरत असलेली..
‘ती’ नावाचा हा घट असा परिपूर्ण व पावन
म्हणून या पावन ऊर्जाघटाची स्थापना
ज्याच्या दैवात झाली त्याच्यासाठी ती ‘देवी’;
आणि ही देवी ज्याच्या आयुष्यात स्थापन झाली नाही
तो ‘दुर्दैवी!’
म्हणून हा देवीच्या – म्हणजे ‘ती’च्या ऊर्जेचा उत्सव
स्त्रीशक्तीचा उत्सव
हे तिच्या शक्तीचे जागरण,
हेच नवरात्र उत्सवाचे प्रयोजन
या दिवसांत सृष्टी पिकला दाणा उदरात घेऊन
‘भरल्या दिवसांची!’
म्हणून तिच्या- जननीच्या- या जननक्षमत्वाचा-
तिच्या गर्भावस्थेचा उत्सव
आत्ताच आपण साजरा केलाय
नऊ महिने नऊ दिवसांच्या गर्भारपणाचे डोहाळे
प्रतिकात्मरूपात ‘नव’रात्रींमध्ये पुरवायचे,
नवनिर्माणाचे प्रतीक म्हणून
मातीवर घट स्थापन करून, नऊ धान्यांचे रूजवण घालून
‘नवरात्र’ साजरे केले..!
– आयुष्याच्या रित्या ‘घागरीत’ या आदिशक्तीचे प्राण फुंकले!
स्त्रीशक्तीचा एक दिव्यशक्ती म्हणून- म्हणजेच ‘देवी’ म्हणून उत्सव साजरा करताना ‘ऊर्जाघट’ या संकल्पनेच्या आधारे स्त्रीच्या तनामनाची अशी ‘घडणूक’ समजून घेणे, हीच तिची षोडषोपचारे केलेली पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्त्रीचे ‘जन्म देणे’ हे कार्य, तिची गर्भावस्था, तिच्या शरीर-मनाच्या अवस्था, तिचे कामिनी रूप, त्याभोवती गुंफले गेलेले संपूर्ण कामजीवन, वैवाहिक जीवन, कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, या व्यवस्थेशी व स्वतःशी चाललेला स्त्रीचा संघर्ष म्हणजेच एकंदरीत स्त्रीपुरुष नातेसंबंधांचा विचार मला झेपेल तसा या निमित्ताने करावासा वाटतो.
स्त्रीऊर्जेचा एक त्रिकोण आहे. स्त्रीचे शरीर, स्त्रीचे मन व स्त्रीची बुद्धी या तीन ठिकाणी ही ऊर्जा विभागली गेली आहे. निसर्गतःच स्त्रीच्या शरीर व मन दोन्हींचे बल पुरुषापेक्षा कमी असते. किंबहुना बल, ऊर्जा, रचना, क्षमता इ. सर्वच बाबतीत स्त्री व पुरुषाच्या शरीर व मन दोन्हींची जडणघडण संपूर्ण वेगवेगळी असते. पण दोघांच्या मेंदूचे- बुद्धीचे मात्र तसे नाही! बुद्धी दोघांमध्ये वेगवेगळी नसून अगदी एकच असते. दोघेही ‘माणूस’च म्हणून मेंदू! बुद्धी अगदी एकसारखीच म्हणजे माणसाचीच असते. ‘पुरुषी बुद्धी’ व ‘बाईलबुद्धी’ असे काही अस्तित्वातच नसताना फक्त पुरुषप्रधान संस्कृतीच्या अहंकाराने हे शास्त्रीय सत्य आजवर अमान्य केले आहे. बाईला ‘माणूस’ न मानणे हे असे अगदी पहिल्याच पायरीवर सुरू झाले आहे! (पुरुष व स्त्रीच्या मेंदूंची रचना व क्रिया समान असतात. फक्त साउंड सेंटर व स्पेशल सेंटर या दोनच ठिकाणी किंचित फरक असतो. म्हणजे दोघांचीही बुद्धी सारखीच असते हे यावरून अधोरेखित होते.)
हा अतिशय विकसित मेंदू व प्रगल्भ बुद्धीच्या जोरावर माणसाने आपले जगणेच इतर प्राण्यांहून वेगळे बनवून टाकले. जगण्याची इच्छा (टू लिव्ह/टू सरव्हाइव्ह) व प्रजनन (स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे- रिप्रॉडक्शन) या प्रत्येक सजीवाच्या मूळ धारणा आहेत. पण या दोन्हींनाही मानवाने भावना व सद्कृतीची जोड दिली आणि त्याचे जगणे व प्रजननसुद्धा इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर बनून गेले. होय, अफाट बुद्धीमुळे माणूस विश्वविजेता ठरला खरा, पण याच बुद्धीला जेव्हा विकार जडू लागले, तेव्हा तेव्हा तो आपले ‘माणूसपण’ विसरून पुन्हा पशू होऊ लागला. यातूनच प्रकृतीला विकृती जडली आणि नॉर्मल ऍबनॉर्मल झाले!
प्रयत्न, जिद्द, चिकाटी इ. सद्गुणांनी जगण्याची इच्छा पूर्ण करणे ही मानवाची प्रकृती आणि लोभ इर्षा मत्सरादि विकारांनी फक्त स्वतःच्याच जगण्याचा विचार करणे ही विकृती. तद्वतच, प्रजजनाच्या बाबतीत सांगायचे तर प्रेम ममत्व निष्ठा इ. भावनांनी नव्या जीवाला दिलेला जन्म हे प्राकृत प्रजनन किंवा ही प्राकृत कामवासना आणि मदमोहभयअतृप्ती इ. विकारांनी ग्रासून निव्वळ शरीरसुख भोगणे ही विकृत कामवासना.
अर्थात कामवासना प्राकृत विकृत; नॉर्मल ऍबनॉर्मल कशीही असली तरी फळ एकच- गर्भधारणा! पुरुषबीज व स्त्रीबीज संयोगातून गर्भ निर्माण होणे हेच कोणत्याही कामवासनेचे फलित! आणि हीच सूर्यप्रकाशाइतकी सत्य असणारी वस्तुस्थिती मानवाच्या विचक्षण बुद्धीला आव्हानात्मक वाटली असावी. सुबुद्धी मानवाने जगण्याच्या खूप चांगल्या पद्धती- सम्यक् (योग्य) कृती- संस्कृती घडवल्या आणि आपले जगणे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करून टाकले. तसेच आपले प्रजनन हीसुद्धा एक वेगळी गोष्ट आहे- असावी. यासाठी प्रजननाच्या मुळाशी असणारी गर्भावस्था व गर्भावस्थेच्या मुळाशी असणारा नर-मादी/स्त्री-पुरुष संबंध हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा अर्थपूर्ण व ‘पवित्र’ असला पाहिजे, असे मानले असावे. यातूनच पुढे नीती-अनीतीच्या संकल्पना जन्माला आल्या असाव्यात, असे मला वाटते. जे नित्याचे नाही ते अनित्य – ती अनीती. ज्या अनीतीमुळे नित्य- रोजचे जगणे मुश्कील होऊन जाते, बिघडून जाते ते अनित्य आचरण! त्याच अनैतिक गोष्टी.
एका नर व मादीने निरंतर एकमेकांच्या सहवासात राहून एकमेकांमध्ये प्रेम-माया-ममत्व-समर्पण-कर्तव्यपूर्ती-सामंजस्य-विश्वास-निष्ठा-जपणूक इ. अनेक पैलू असणारे एक नाते निर्माण करून ह्या नात्याने एक नवा जीव जन्माला घालणे हे त्या नात्याला अर्थपूर्ण व सुदृढ करणारे- पावित्र्य देणारे! आणि हेच त्यांच्या संबंधातून झालेल्या गर्भावस्थेचे पावित्र्य! अशा अर्थाने पवित्र स्त्री व पुरुष म्हणजे माता व पिता! व अशी गर्भावस्था त्या गर्भवतीला दिव्य मातृत्वाची प्रचिती देणारी म्हणजेच मातृरूपी ‘देवीत्व’ प्रदान करणारी ठरते.
नवरात्रोत्सव हा असा स्त्रीच्या जनन(जन्म देणे) कार्याचा- स्त्रीच्या शरीरमनांच्या क्षमतांचा उत्सव आहे असे आपण खात्रीने म्हणतो आहोत व त्यासाठी स्त्रीची गर्भावस्था, स्त्री-पुरुष संबंध किंवा यालाच शास्त्रीय संज्ञा असलेले ब्रह्मचर्य आणि अब्रह्मचर्य जगण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावते हे तटस्थपणे समजून घेत आहोत.
आयुर्वेदाने चांगल्या आरोग्याचे जे महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे- तीन उपस्तंभांचा.
१) आहार, २) निद्रा व ३) ब्रह्मचर्य/अब्रह्मचर्य हे आरोग्याचे तीन उपस्तंभ आहेत. या तीन दगडांच्या चुलीवर आरोग्याचे रसायन शिजावे लागते. यानुसार आहार व निद्रेनंतर त्यांच्याएवढेच महत्त्व ब्रह्मचर्याला आहे. आणि अब्रह्मचर्यालासुद्धा! अजून बारकाईने याकडे बघताना तीन उपस्तंभ संपूर्ण आरोग्य कसे सांभाळतात याचा नवा शोधच मला लागला, तो असा की-
आहाराचा संबंध – शरीरस्वास्थ्याशी; निद्रेचा संबंध मनस्वास्थ्याशी आणि ब्रह्मचर्य/अब्रह्मचर्याचा संबंध बौद्धिक स्वास्थ्याशी आहे.
ही वस्तुस्थिती नव्याने लक्षात आली तेव्हा आज अवतीभवती दिसणार्या अनेक कौटुंबिक-सामाजिक समस्यांच्याही मुळापर्यंत मला जाता आले. या समस्यांचा ऍज ए होल विचार करताना निर्माण झालेली समस्या कुठून उगम पावली आहे, हे शोधणे गरजेचे ठरते. आधुनिक मानसविज्ञानाने यासंदर्भात- प्रॉब्लेम स्टार्टस् फ्रॉम बेड- असे म्हटले आहेच. अर्थात प्रत्येक समस्या बेडपासूनच सुरू होते असा याचा अर्थ नसून बेडवर असलेला प्रत्येक छोटा-मोठा प्रॉब्लेम काही ना काही छोटीमोठी कौटुंबिक समस्या निर्माण करू शकतो.. असा घेतल्यास जास्त योग्य. आयुर्वेदाने तीन उपस्तंभांमध्ये ब्रह्मचर्य / अब्रह्मचर्याचा समावेश करून हेच तर सारे हजारो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. आपण फक्त डोळसपणे हे सगळे बघायला हवे आहे. असो. या विषयाला महासागराची व्याप्ती आहे.
नवरात्रोत्सव हा असा स्त्रीच्या जननकार्याचा – स्त्रीच्या शरीरमनांच्या क्षमतांचा उत्सव, स्त्रीच्या विधायक ऊर्जेचा उत्सव आहे. ही अशी जन्मदात्री- धात्री आणि मृत्यूदात्रीसुद्धा.
* चांगल्या ऊर्जेने ती जन्म देऊ शकते.
घातक ऊर्जेने विनाशही करू शकते.
* पाणी आणि आग दोन्ही एकाच वेळी तिच्यात नांदतात.
ऊन आणि पाऊस
दिवस आणि रात्र
उजेड आणि अंधार हे ‘तिचेच’ चमत्कार!
हे सारे ‘सृष्टी’चेच चमत्कार!
* जनन-मरणाची वर्तुळे तिच्यातच पूर्ण होतात.
पाऊस तिचा व पूरही तिचा.
ऊन तिचे व दुष्काळही तिचा
वारा तिचा व वादळही तिचेच!
सगळे भूषणावह तिलाच
सगळ्याचे दूषणही तिलाच आणि सगळे प्रदूषणही तिचेच!
* सगळे सृष्टीचेच प्रदूषण- कुणी केले तिचे हे प्रदूषण?
माणसाने! तेजस्वी बुद्धी मिळालेल्या माणसाने!
‘पुरुषाने’ ‘ति’चे प्रदूषण केलेच;
पण स्त्रीने स्वतःचे स्वतःही प्रदूषण केले.
* हे असेच चालू राहिले तर सर्वनाश होईल.
भयंकर आग किंवा प्रलय होईल. विलय होईल पण विलयानंतर पुन्हा उत्पत्ती, नंतर स्थिती, पुन्हा प्रलय जनन-मरणाचे हे फेरे, जन्ममरणाची ही प्रचंड क्षमता फक्त सृष्टीचीच- एकट्या ‘ती’चीच!
पुरुषाने हे ‘दिव्य स्त्रीत्व’ जाणले नाही आणि स्त्रीने स्वतःचा हा अफाट ‘पुरुषार्थ’ जाणला नाही.
* स्त्रीत्व व पुरुषत्व अशी दोन्ही तत्त्वे ज्या ‘माणसामध्ये’ त्या ‘माणसानेच’ बुद्धीच्या ऊर्जेचे प्रदूषण केले. म्हणून ‘ती’च्या ऊर्जेचे प्रदूषण व्हायला जोवढा ‘तो’ जबाबदार, तेवढीच ‘ती’ही कारणीभूत ठरली.
* हो! हे असेच झाले होते.
कोणे एके काळी- पुराणात हे असेच झाले होते.
स्त्री-पुरुष दोघेही बिघडली होती.
‘माणूस’ म्हणून लाभलेली त्यांची बुद्धी बिघडली होती. माणसांच्या जगात राक्षस माजला होता.
* अशा कल्लोळात विवेकी बुद्धीचे ऊर्जाघट घेऊन एक ‘दिव्यशक्ती’ पुढे आली-
आठा दिशांच्या जबाबदार्या ‘अष्टभुजांनी’ पेलणारी
सामर्थ्यवान- अष्टावधानी ‘ती’ पुढे आली
बिघडलेल्या पुरुषत्वाचे व बिघडलेल्या स्त्रीत्वाचे मर्दन करण्यासाठी आणखी दोन हात धारण करून ती ‘दशभुजा’ बनली!
शरीर- मन- बुद्धीच्या संतुलित विचारांचा त्रिशूल
तिने या मुख्य दोन हातात धारण केला.
धैर्यसिंहावर आरूढ झाली….
* तिने ममत्वाच्या- दयेच्या- मायेच्या सर्व सीमांचे उल्लंघन केले. नऊ महिने नऊ दिसांच्या आपल्या कनवाळू जननीरूपाला ओलांडून ती पुढे आली.
इतकेच नव्हे तर साक्षात नवरात्रीची आपली सकाम अवस्थाही तिने पादाक्रांत करून टाकली!
‘दश दिशां’च्या सीमा तिने पार केल्या.
हा तिने स्वतःवर मिळवलेला ‘विजय’ होता.
* ती- तशीच वेगाने पुढे गेली – भयंकर ‘दुर्गावतार’ धारण केला.
आणि विलक्षण ऊर्जेच्या अवसरात
तिने ह्या माजलेल्या महिषबुद्धी असूराला थेट ठार केले!
स्वतःच्या व इतरांच्या आयुष्याचे
हिरवेगार सोने करून सुख लुटून देणारी
पुराणातली ही एक ‘विजया’- ‘देवी’ बनून गेली.
– आज प्रत्येक ‘देवी’ने असे विजयी व्हायला हवे आहे!!