विजयोत्सव

0
26

आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला विश्वचषक क्रिकेट सामन्यामध्ये पुन्हा एकवार चारीमुंड्या चीत करून भारताने आपला दरारा पुन्हा एकवार दाखवून दिला आहे. आजवरच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानला भारताकडून सतत आठवेळा पराभव पत्करावा लागला आहे हा इतिहास पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या जखमेवर अधिक मीठ चोळून जाईल यात शंका नाही. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर आणखी एकदा मिळवलेला विजय एवढेच ह्या सामन्याचे वैशिष्ट्य नाही. आजवरच्या सर्व विजयांपेक्षा हा सर्वांत मोठा विजय आहे हे त्याचे खरे वैशिष्ट्‌‍य आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे म्हणजे जणू विश्वचषक पटकावण्यासारखेच आहे अशीच भारतीय क्रिकेटरसिकांची नेहमी भावना असते. त्यामागे आपल्या देशाविरुद्ध सतत कटकारस्थाने करीत आलेल्या त्या देशाला किमान क्रिकेटच्या मैदानावर तरी धडा शिकवण्याची सुप्त आकांक्षाच असते. काल पाकिस्तानचा डाव सुरू झाला आणि दोन बाद 155 पर्यंत त्यांचा डाव भक्कमपणे उभा राहताना दिसला, तेव्हा आपण हा सामना गमावून बसतो की काय अशी साशंकता निर्माण झाली होती. परंतु नंतर मात्र पाकिस्तानचा डाव ढासळत गेला. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान तंबूत परतल्यानंतर पाकचे पुढचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. त्यामुळे बघता बघता पाकचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 191 धावांवर ढासळला. विशेष म्हणजे जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या सर्वांना प्रत्येकी दोन गडी बाद करता आले. बुमराहचे दोन चेंडू तर कमालीचे होते. सिराजच्या गोलंदाजीवर पाकच्या धावा निघाल्या खऱ्या, परंतु संघाला जेव्हा गरज होती तेव्हा त्याने बळी घेऊन पाकिस्तानचा डाव रोखण्यास मदत केली. कुलदीप यादवची गोलंदाजीही कमालीची होती. भारतीय गोलंदाजांनी अत्यंत शिस्तीत गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी टाकलेल्या 43 षटकांमध्ये एकही नो बॉल नव्हता हे विशेष लक्षात घेण्यासारखे होते. केवळ एक वाईड बॉल गेला. कप्तान रोहित शर्माने आपल्या जलद आणि फिरकी गोलंदाजांची अदलाबदल करीत पाकिस्तानचा डाव रोखण्याची शिकस्त केली. मात्र, गोलंदाजीची खरी कमाल पाकिस्तानच्या डावाच्या उत्तरार्धातच पाहता आली. भारताने फलंदाजी सुरू केली, तेव्हा 192 धावांचे लक्ष्य हे तसे आवाक्यातले असल्याने कोणता खेळाडू डावावर आपले नाव कोरतो हेच महत्त्वाचे होते. मात्र, नुकताच डेंग्यूच्या आजारातून निभावून खेळात परतलेला शुभमन गिल बाद झाला तेव्हा पुढे काय होणार ही चिंता चाहत्यांच्या मनात घर करू लागली होती. मात्र विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी भागिदारीने भारतीय डाव सावरला. पंधरा षटकांतच भारताने 111 धावा गाठल्या होत्या. भारतीय फलंदाजीचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी सहा षटकारही फटकावले. पाकिस्तानी फलंदाजांना एकही षटकार ठोकता आला नव्हता. भारतीय फलंदाजीत सर्वांत कमाल दाखवली ती फक्त 36 चेंडूंत अर्धशतक फटकावणाऱ्या कप्तान रोहित शर्मानेच. संघाच्या कप्तानाने आघाडीवरून लढावे तसा तो ह्या सामन्यात लढला. शाहीन शाह अफ्रिदीच्या एका चेंडूवर त्याने ठोकलेला षटकार डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. त्याच्या 86 धावांनी भारतीय संघाचा विजय सुलभ केला. विराट कोहलीच्या डावाने मात्र निराशा केली. तो जेमतेम सोळा धावांवर बाद झाला. एस. अय्यरच्या तडाखेबंद नाबाद 53 धावा आणि केएल राहुलच्या नाबाद 19 धावा भारताला दणदणीत विजय संपादन करण्यास पुरेशा होत्या. सात गडी राखून भारताने पाकिस्तावर मिळवलेल्या ह्या विजयाने अहमदाबादच्या विराट नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आणि दूरचित्रवाणीवर हा सामना पाहणाऱ्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना खुष केले. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील भारत सामना जिंकणार असे दिसताच स्टेडियममध्ये जातीने उपस्थित झाले होते. भारताच्या पाकिस्तानवरील ह्या विजयाने भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा निश्चितच उंचावल्या आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील विजयामुळे भारत या स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे. आजवरच्या तीन सामन्यांपैकी तिन्ही भारतीय संघाने जिंकले आहेत आणि सहा गुण पटकावले आहेत. यापुढील विश्वचषक सामन्यांमध्ये संघाची कामगिरी अशीच उजवी राहावी आणि पुन्हा एकवार विश्वचषकावर भारताचे नाव दिमाखात कोरले जावे अशीच आज देशातील कोट्यवधी क्रिकेटचाहत्यांची इच्छा आहे. येणारे दिवस दसरा दिवाळीचे म्हणजेच सणासुदीचे आहेत. पाकिस्तानवरील सात गडी राखून मिळवलेल्या ह्या दणकेबाज विजयाने भारतीयांची दसरा आणि दिवाळी आधीच साजरी झाली असे म्हणायला हरकत नाही.