>> पाकिस्तानविरुद्धचा पहिला कसोटी सामना आजपासून
पाकिस्तान व इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. विंडीजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकल्यामुळे इंग्लंडचा संघ भरात असून यजमानांचा सध्याचा फॉर्म पाहता पाहुण्या पाकिस्तानचा त्यांच्यासमोर निभाव लागणे कठीण वाटत आहे.
विंडीजविरुद्धच्या शेवटच्या दोन्ही कसोटीत दमदार प्रदर्शन केलेली इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांची फळी पाकिस्तानला लोळवण्यासाठी सज्ज झाली आहे. बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त असल्यास इंग्लंडचा संघ आर्चर, ब्रॉड, अँडरसन या केवळ तीन वेगवान गोलंदाजांसह उतरणार आहे. डॉम बेसच्या रुपात संघात एकमेव फिरकीपटू असेल. स्टोक्स केवळ स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळत असल्यास एखाद्या फलंदाजाचा बळी देत ख्रिस वोक्स किंवा सॅम करन यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉडला बाहेर बसवले होते. यावेळी ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती इंग्लंडकडून होणार नाही.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत एक-दोन अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. पाकिस्तानविरुद्ध मात्र त्यांना हे टाळावे लागेल. पाकिस्तानच्या गोलंदाजी फळीत विविधता आहे. वेग फारसा नसला तरी टप्पा व दिशा राखत चेंडू सीमच्या आधारे आत-बाहेर करण्याची क्षमता मोहम्मद अब्बासकडे आहे. नवोदित नसीम शाह याच्याकडे वेग आहे. सातत्याने ताशी ८८ ते ९० मैल वेगाने गोलंदाजी करून तो इंग्लंडच्या फलंदाजांचा चकित करू शकतो. शाहिन शाह आफ्रिदी हा मागील दोन वर्षांत पाकिस्तानच्या कसोटी संघातील प्रमुख गोलंदाज बनला आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करून खेळपट्टीकडून मदत मिळवण्यासाठी तो ओळखला जातो. लेगस्पिनर यासिर शाह याचा मागील इंग्लंड दौर्यातील अनुभव संमिश्र असला तरी मागील अनुभवातून शहाणा होण्याची संधी त्याला या दौर्यात मिळणार आहे. अतिरिक्त फलंदाज किंवा शादाब खान व फहीम अश्रफ यांच्या रुपात अष्टपैलू खेळवण्याचा पर्याय पाकिस्तानकडे आहे.
पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी खेळपट्टीचे स्वरुप पाहता दोन फिरकीपटूंसह उतरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे प्रमुख लेगस्पिनर यासिर शाह याच्यासह गुगली गोलंदाजीसह तळातील उपयुक्त फलंदाज असलेल्या शादाब खान याला पसंती मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या डावखुरा संथगती गोलंदाज काशिफ भट्टी याला खेळवण्याचा पर्यायही पाकिस्तानकडे आहे.
पाकिस्तानची फलंदाजी फळी डळमळीत वाटते. वनडे व टी-ट्वेंटीत स्वतःला सिद्ध केल्यानंतर बाबर आझम याच्यावर कसोटीत चांगली कामगिरी करण्याचा दबाव असेल. कसोटी स्पेशलिस्ट अझर अली व असद शफिक यांना अधिक जबाबदारीेेने खेळावे लागणार आहे. पाकिस्तानच्या मागील इंग्लंड दौर्यात जेम्स अँडरसन याने पाकचा सलामीवीर शान मसूद याला बळीचा बकरा बनवले होते. त्यामुळे संघाला चांगली सलामी देत संघातील जागा राखण्यावर त्याचा भर असेल.