भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळविला जाणार आहे. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकून आत्मविश्वास उंचावलेला असल्याने वनडे मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिकेतील इतर मैदानांच्या तुलनेत डरबनमधील खेळपट्टी किंचित संथ मानली जाते. यामुळे फलंदाजी करणे सोपे जाणार आहे तसेच वेगवान गोलंदाजांना या मैदानावर अधिक मेहनतदेखील घ्यावी लागणार आहे. डीव्हिलियर्सची अनुपस्थिती टीम इंडियाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. डीव्हिलियर्सची जागा ऐडन मारक्रम किंवा खाया झोंडो घेऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेचा संघ इम्रान ताहीरच्या रुपात एकमेव स्पेशलिस्ट फिरकीपटू खेळवणार असून टीम इंडियाने याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. फिरकी हे भारताचे बलस्थान असून वनडेमध्ये दोन फिरकीपटू खेळविणे भारताला फायदा मिळवून देऊ शकते. भारताला डरबनवर एकदिवसीय सामन्यात अजूनपर्यंत विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे पराभवाची ही मालिका खंडित करण्यासाठी फलंदाज व गोलंदाजांचा समन्वय राखणे गरजेचे आहे.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल.
द. आफ्रिका (संभाव्य) ः क्विंटन डी कॉक, हाशिम आमला, फाफ ड्युप्लेसी, ऐडन मारक्रम, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, आंदिले फेलुकवायो, कगिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल व इम्रान ताहीर.