– लक्ष्मण कृष्ण पित्रे
आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीला, विशेषतः हिंदूंच्या धार्मिक जीवनाला व्यापून राहिलेली अशी लोकप्रिय देवता म्हणजे गणपती होय. आपल्या धार्मिक धारणेनुसार हा देव मंगलाचा अधिष्ठाता आहे, सर्व विद्यांचे निवासस्थान आहे, तसेच सर्व कलांचा प्रेरणास्रोत आहे. तो विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ताही आहे, म्हणजेच विघ्ननियंता आहे. त्याच्या स्मरणाने विघ्नांचा परिहार होऊन कोणतेही कार्य सुरळीतपणे पूर्ण होते. त्यामुळेच कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याचे स्तवन, पूजन केले जाते. त्याच्या कृपाकटाक्षाने अमंगल टळून मांगल्याची वृद्धी होते, अशी श्रद्धा जनमानसांत दृढ आहे.
आपल्या हिंदू धर्मातल्या असंख्य देवतांमध्ये गणपतीलाच हे अनन्यसाधारण स्थान प्राप्त झालेले आहे. तो पंथातीत आहे. आपल्या धर्मातल्या असंख्य पंथोपपंथांतल्या कुणाही भक्तांचा गणपतीला विरोध नसतो; किंबहुना आपल्या इष्ट देवतेची पूजा करण्यापूर्वी आवर्जून गणपतीपूजन केले जाते.
आज आपण जे एखादे दैवत विशिष्ट गुणांनी आणि रूपाने युक्त मानून त्याची आराधना करतो, त्या दैवताने वस्तुतः आपल्या युगानुयुगांच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे अनुभवलेली असतात. त्या-त्या काळातील समाजमनातील विचारांचा, धारणांचा, भावनांचा आणि आशा-अपेक्षांचा परिणाम त्या देवतेचे रूप घडण्यामध्ये आणि त्याच्या परिवर्तनामध्ये झालेला दिसून येतो. या सगळ्या प्रक्रियेतून घडत गेलेले देवतारूपच आज आपल्यासमोर असते. गणपतीच्या बाबतीतही हेच घडलेले आहे. पूर्वी विघ्नकर्त्या क्रूर विनायकगणांचा अधिपती मानला गेलेला हा विघ्नराज गणपती आज विघ्नहर्ता, सर्वमंगलाचे प्रतीक, सर्व विद्यांचा अधिष्ठाता आणि सर्व कलांचा प्रेरक देव बनलेला आहे.
गणपतीच्या बाबतीत ही स्थित्यंतरे कशी घडली ते पाहणे उद्बोधक ठरेल. आदिमानवाच्या दृष्टीने प्रचंड आकाराचा, शक्तिमान आणि बुद्धिमान गजराज हे एक निसर्गनिर्मित आश्चर्यच होते. गजराजाच्या भव्य रूप-गुणांविषयीच्या भयमिश्रित आदरातूनच त्याच्याविषयी देवत्वाची कल्पना मानवाच्या मनात रुजली असली पाहिजे. यातून मूळ गणपतीची संकल्पना सिद्ध झाली असावी.
आर्यपूर्वकाळापासून अस्तित्वात असलेली ही देवता हळूहळू संस्कृतिसंगमाच्या प्रक्रियेत आर्यदेवतासमूहामध्ये समाविष्ट झाली असे अभ्यासकांचे मत आहे. कारण ऋग्वेदासारख्या प्राचीन ग्रंथात गणपतीचा उल्लेख आढळत नाही. ऋग्वेदातील ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे|’ ही ऋचा गणपतीला उद्देशून नसून ब्रह्मणस्पती या देवतेची आहे. तसेच ऋग्वेदातील गणपती सूक्त म्हणून प्रसिद्ध असलेले ‘आतून इन्द्र क्षुमन्तेम्’ हे सूक्त वस्तुतः इंद्राचे सूक्त आहे. ‘महाहस्ती दक्षिणेन’ एवढ्या उल्लेखावरून ते मागाहून गणपतीशी जोडले गेले. तसेच यजुर्वेद वगैरे इतर वेदांतील तत्सम उल्लेखही रुद्र वगैरे इतर देवतांविषयीचे आहेत. इसवीसनपूर्व कौटिलीय अर्थशास्त्रासारख्या ग्रंथातही गणपतीचा उल्लेख आढळत नाही.
सुरुवातीच्या पुराणांमध्ये गणपती हे विशेषण मरुद्गणांचा अधिपती म्हणून रुद्राला दिलेले आढळते. तसेच ‘लंबोदर’, ‘गजेंद्रकर्ण’ ही विशेषणेही शिवपुराणात शिवाला उद्देशून आढळतात. तसेच शिवाची ‘नागभूषण’, ‘भालचंद्र’, ‘त्रिनेत्र’ इत्यादी विशेषणे पुराणात गणपतीलाही लावलेली दिसतात, यावरून सुरुवातीला रुद्र, शिव आणि गणपती ही एकच अभिन्न देवता मानली गेली असावी असे दिसते. नंतर गणपती हा शिवगणांचा प्रमुख व शिवपुत्र मानला गेला, या कल्पनेचे बीजही या समजुतीत दिसून येते.
इतिहासात ‘गुप्तकाळ’ म्हणजे इसवीसनाचे पाचवे-सहावे दशक. त्यापूर्वीच्या वाङ्मयात गणपतीचे निर्विवाद उल्लेख आढळत नाहीत, त्यामुळे त्याचा समावेश आर्यदेवतासमूहामध्ये त्यानंतरच झाला असे मानता येते. त्यामुळे गणपती ही मुळात आर्यपूर्वकालीन देवता होती या मताला पुष्टी मिळते. पुरातत्त्वीय पुराव्यांवरूनही असे दिसून येते की, गजमुख हा प्राचीन काळापासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देवत्व पावलेला आहे. प्राचीनकाळी ही एखादी ग्रामदेवता असू शकेल. एखाद्या झाडाखाली स्थापन झालेल्या या देवतेपुढे त्याकाळी बळीही दिला जात असेल. त्या बळीच्या रक्ताने अभिषेकही केला जात असेल. सिंदुराचा संदर्भ असाही लागू शकतो. तसेच रक्तवस्त्र, रक्तचंदनाची उटी, लाल फुले व दूर्वा यांचा पूजनात समावेश ही वैशिष्ट्ये तर सरळ त्या देवतेच्या आर्येतर मुळाकडेच निर्देश करतात.
ही देवता पुढे आर्य संस्कृतीत स्वीकारली गेली तेव्हा ऋग्वेदातील काही सूक्ते त्याच्याशी संबद्ध मानली जाऊ लागली. गणपतीची गणना शिवगणांमध्ये होऊ लागली. पुढे तो शिवगणांचा प्रमुख बनला. त्यानंतर त्याच्या उपासकांनी त्याला शिव-पार्वतीचा पुत्र आणि कार्तिकेयाचा भाऊ बनविला आणि मग यासाठी सुसंगत अशा कथा पुराणांतून निर्माण करण्यात आल्या. मुदगलपुराण आणि गणेशपुराण ही पुराणेही निर्माण झाली. काही गृह्यसूत्रांतील उल्लेखांप्रमाणे विनायक अनेक असून ते क्रूर आणि उपद्रवकारी असतात. त्यांना चतुष्पथावर (चव्हाट्यावर) नैवेद्य ठेवून प्रसन्न करून घ्यावे लागते. चार दिशांना चार विनायक असून त्यांची शांती करावी लागते.
बौधायन गृह्यसूत्रानुसार चार विनायकांचा एक विनायक होतो. त्याला शिवाने आपला गणपती विनायक केले. त्याच्यावर विघ्ने निर्माण करण्याचे कार्य सोपविले. त्यात त्याला ‘हस्तिमुख’ असे नावही दिले आहे. तो विघ्ने करणारा असला तरी विधिपूर्वक त्याची शांती केल्यास विघ्न हरण करतो आणि कार्यपूर्तता होते, त्यामुळे त्याला विघ्नहर्ता किंवा विघ्नेश्वर असे नाव मिळाले.
विघ्नहर्ता गजाननाचे हे रूप घडण्याची प्रक्रिया गुप्तकाळात (इ.स. ३०० ते ५५०) घडली. याच काळातील नव्या उपनिषदांमध्ये ‘गणपत्यथर्वशीर्ष’ या उपनिषदाची भर पडली. त्यात त्याला सर्व देवात्मक मानून प्रत्यक्ष ब्रह्मच मानण्यात आले. आज आपल्यासमोर असलेले गणेशरूपही गणपत्यथर्वशीर्षातून सिद्ध झालेले दिसते.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्
रदं च वरदं हस्तै र्बिभ्राणं मूषकध्वजम्
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पेंः सुपूजिनम्|
– एक दात असलेला, चार हातांचा, तीन हातांत पाश, अंकुश आणि (स्वतःचा मोडका) दात धारण करून चौथा हात वरदमुद्रेत ठेवणारा, उंदीर हे चिन्ह असलेला, रक्तवर्णाचा, मोठ्या पोटाचा, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्रे ल्यालेला, रक्तचंदनाची उटी लावून लाल फुलांनी पुजला जाणारा असे हे वर्णन आजही गणपतीला लागू पडते.
मुळात विघ्नकर्ता असा हा देव नंतर आर्यांच्या ब्रह्मणस्पतीशी तादात्म्य पावला. नंतर तो शिवगणांचा अधिपती आणि प्रत्यक्ष शिवाचा पुत्र बनला. त्याच्या विविध पुराणकथा निर्माण झाल्या. स्वतंत्र पुराणेही निर्माण झाली आणि हळूहळू हा देव विघ्नहर्ता बनला. मंगलकारक बनला. प्राचीनकाळी एखाद्या झाडाखाली बस्तान ठोकून ग्रामरक्षण करणारा हा देव आज आपल्या संस्कृतीला सर्व अंगांनी व्यापून राहणारा सर्वमान्य, सर्वपूजित असा देव बनला आहे. त्या विघ्नेश्वराला प्रणाम असो.