स्वस्तिक आयोजित व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबर्टी आर्ट, पुणे प्रस्तुत ११ व्या स्वरमंगेश संगीत महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी रविवारी विख्यात गायक उस्ताद रशिद खान, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे, ख्यातनाम तबलानवाज पं. आनिंदो चटर्जी यांच्या मैफलींनी रसिकांना मनमुराद आनंद दिला.
सकाळच्या सत्राचा प्रारंभ कोलकाता येथील युवा प्रतिभाशाली गायिका संगबोर्ती दास हिच्या रसिल्या गायनाने झाला. तिने प्रथम तोडी राग विस्ताराने आळविला. आवाजातील गोडवा, मधुर आलापी, रसपरिपोषक आलापी, बोल आलापी व प्रभावी तानांची गुंफण आणि एकूणच व शैलीदार पेशकश यामुळे त्यांना उत्स्फूर्त दाद लाभली. त्यांना सुभाष फातर्पेकर (संवादिनी) व दयानिधेश कोसंबे (तबला) यांनी पुरक साथ दिली. अर्षद अली खान यांनी त्यानंतर बहारदार गायनाने रंग भरला. त्यांना अजय जोगळेकर यांनी संवादिनीवर आणि उस्ताद अक्रम खान यांनी तबल्यावर उत्कृष्ट साथ दिली.
सकाळच्या सत्राचा समारोप पं. आनिंदो चटर्जी (तबला) व पं. प्रताप पाटील (पखवाज) यांच्या रंगतदार जुगलबंदीने झाला. सुरवातीला पं. आनिंदो यांनी झपतालमध्ये एकलवादन करून रसिकांना भरभरून आनंद दिला. त्यानंतर तबला पखवाज जुगलबंदीने कळस गाठला.
संध्याकाळच्या सत्राचा प्रारंभ अनुपमा भागवत यांच्या सुरेख सतारवादनाने झाला. त्यांनी आलाप, जोड, झाला, विलंबित तिनताल व द्रुत एकताल मधील दोन बंदिशी याक्रमाने पटदीप राग वाजविला. त्यांच्या वादनात मिंड, गमक, झमझमा व लयकारी अंगाचा सौंदर्यपूर्ण मेळ साधला होता. नंतर मिश्र पिलू ऐकवला. त्यांना उस्ताद अक्रम खान यांनी रंगभरी तबला साथ दिली. त्यानंतर अश्विनी भिडे यांची मनभावन मैफल झाली. त्यांनी मारू बिहाग राग विस्ताराने आळविला. लडिवाळ स्वरछटानी त्यांनी केलेले अलंकरण, रसिली बोलबात, तानांची प्रभावी गुंफण आणि तिन्ही सप्तकातील सहज आविष्कार अशा पेशकशीमुळे त्यांनी निर्भेळ आनंद दिला. बागेश्री रागातील साडे नऊ मात्रातील एक व द्रुत तिनताल मधील अशा दोन बंदिशीही त्यांनी ऐकवल्या. त्यांना त्यांची शिष्या कौशल हाजी हिने उत्तम गायन साथ केली. मयंक बेडेकर (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांची साथही पुरक होती.
उस्ताद रशिद खान यांनी समारोपाच्या मैफलीत आपल्या भारदस्त गायनाने रसिकांना भरभरून आनंद दिला. जोग राग त्यांनी चैनीदारीत आळवला. सुरवातीलाच त्यांनी खर्ज असा काही भरला की वातावरण भारून गेले. वजनदार आवाज, रियाजाने आवाजाला आलेली गोलाई, भरदार आलापी, लयकारीची नजाकत, विद्युलतेसारखी फिरणारी तान आणि एकूणच माहोल निर्माण करणारी पेशकश यामुळे त्यांच्या गायनाचा पूर्ण आनंद रसिकांनी लुटला. त्यांना त्यांचे शिष्य अरमान खान, नागेश आडगावकर यांनी चांगली गायन साथ केली. अजय जोगळेकर (संवादिनी), पं. राम कुमार मिश्रा (तबला), उस्ताद मुराद अली (सारंगी) यांची साथसंगत मैफलीची शान वाढविणारी होती.
गोव्यात लिबर्टी आर्ट स्कूल सुरू करणार : डॉ. जोशी
समारोपाच्या सत्रात, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबर्टी आर्टच्या डॉ. प्रीती जोशी यांनी मनोगतात, संस्थेची बत्तीस स्कूल असून गोव्यात लवकरच लिबर्टी आर्ट स्कूल सुरू करून हॉलिस्टिक एज्युकेशन दिले जाईल अशी घोषणा केली. यावेळी स्वस्तिकच्या सचिव योगिता याजी यांच्या हस्ते स्वरमंगेश स्मणिकेचे संपादक नितीन कोरगावकर यांचा सन्मान करण्यात आला. रशिद खान यांची मैफल ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.