डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून विश्वास व्यक्त; मुख्यमंत्रिपदी 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण
‘विकसित गोवा 2047’चे ध्येय 10 वर्षे अगोदर म्हणजेच 2037 गाठणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. राज्यात विकसित गोवा 2047 या उपक्रमाचा शुभारंभ लवकरच केला जाणार आहे. या विकसित गोवा 2047 प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम चाणक्य सर्व्हिसेसला देण्यात आले आहे. चाणक्य सर्व्हिसेसने काल या प्रकल्पाचे सादरीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. विकसित गोवा 2047 साठी राज्यातील तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. प्रमोद सावंत यांनी आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात राज्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाल्यानंतर 19 मार्च 2019 रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागांसह विजय मिळाल्यानंतर 28 मार्च 2022 रोजी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर 6 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा हा उपक्रमातून राज्याच्या ग्रामीण भागातील विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमातून स्वयंपूर्ण मित्रांना पंचायत कार्यालयात पाठवून नागरिकांच्या तक्रारी, प्रश्न जाणून घेऊन सोडविण्याची सूचना केली. या उपक्रमामुळे कृषी विकासाला चालना देण्यात आली. स्वयंरोजगार करणाऱ्या महिला बचत गटांमध्ये वाढ होण्यास मदत झाली. याशिवाय राज्य सरकारच्या योजनांबरोबर केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे ते लक्ष देत आहेत. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल भाजपच्या केंद्रीय नेत्याकडून घेतली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा भरभक्कम पाठिंबा मिळत आहे.
मुख्यमंत्री म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी डॉ. प्रमोद सावंत यांचे बुधवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. माजी प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह केंद्रीय पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.