विकलांगांसाठीच्या शाळेची जन्मकहाणी

0
148
निरोप समारंभात सौ. वीणा सोवनी यांना गौरविताना उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा

ज्यांच्या मूकबधीर मुलाची कहाणी ऐकल्यावर स्व. नारायण आठवले यांनी विकलांग मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समजून घेऊन लोकविश्वास प्रतिष्ठान या आजच्या प्रथितयश संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, त्या या संस्थेच्या मूकबधीर शाळेच्या पहिल्या शिक्षिका सौ. वीणा सोवनी नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. निरोप समारंभात त्यांनी आपल्या भाषणातून आठवणींना उजाळा दिला…
लोकविश्वास प्रतिष्ठानच्या शाळेच्या जवळजवळ ३३ वर्षांच्या कालखंडानंतर आपला निरोप घेताना असंख्य आठवणी मनात दाटून येत आहेत. माझ्या विवाहानंतर मी पुण्यातून गोव्यात येऊन स्थायिक झाले. कालांतराने मला मुलगा झाला, पण तो आनंदाचा काळ क्षणिक ठरला. माझा मुलगा तुषार दीड – दोन वर्षांचा झाला, पण तो बोलत नाही, त्याला ऐकू येत नाही हे लक्षात आल्यावर पणजी, बेळगाव, मिरज, पुणे, मुंबई येथे त्याला तपासण्यासाठी भटकंती झाली. तो मूकबधीर असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. माझ्या कुटुंबावर तो जबरदस्त आघात होता. हात – पाय हलविल्याशिवाय व मन खंबीर केल्याशिवाय इलाज नव्हता.
व्यंग असलेले मूल भविष्यात ग्रामीण भागात चेष्टेचा किंवा टिंगलीचा विषय बनू नये म्हणून मुलाच्या प्रगतीसाठी आम्ही खेड्यातून शहरात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. ऑगस्ट १९७८ मध्ये आम्ही गोवा हाऊसिंग बोर्डाकडून मासिक हप्तेबंदीच्या तत्त्वावर फोंडा येथे घर विकत घेतले.
नोव्हेंबर १९७८ मध्ये मुलासह माहेरी गेले असताना पुण्यातील वि. रा. रुईया मूकबधीर विद्यालयात मुख्याध्यापिका मालतीबाई जोशींकडे मुलाला बालवर्गात दाखल करण्यासंबंधी विचारपूस करण्यासाठी भेटले. या भेटीत मूकबधीर शाळेला जोडूनच शिक्षक प्रशिक्षणाची तेथे सोय असल्याचे समजले. मालतीबाई जोशींनी ‘पालक शाळेसंबंधी विचारपूस करून जातात, पण नंतर तोंडच दाखवत नाहीत. तुम्ही जूनपासून मुलाला शाळेत पाठवा, नाही तर तुमचा मुलगा फुटक जाईल’ अशा तिखट शब्दांत माझी कानउघडणी केली. त्यांचे बोचरे शब्द बाणासारखे माझ्या मनात घुसले आणि काळजात धस्स झाले. मी अबोलपणे त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर घरातील प्रत्येक दिवशी मुलाच्या भविष्याची टोचणी मनाला अस्वस्थ करीत होती.
गोव्यात मूकबधीरांसाठी कुठेच शाळा नाही. नवर्‍याची नोकरी डिंगणे – सुर्ल सारख्या ग्रामीण भागात. अत्यंत तुटपुंजा पगार. घराचे मासिक हप्ते भरून मुलाला पुण्याच्या शाळेत पाठवायचे कसे? जमाखर्चाची हातमिळवणी करायची कशी? आजारी मुलाला उपचार करता येतात. कुठून तरी कर्ज काढून पैसे गोळा करता येतात, पण जन्मतःच मूकबधीरपणाचे व्यंग असल्यावर उपचार तरी काय करणार! मन अक्षरशः सुन्न झाले. पण शेवटी प्रदीर्घ काळ प्रयत्न, जिद्द, चिकाटी या संकटांना सामोरे जात व पैशाचे पाठबळ प्राप्त करीत भविष्याकडे केवळ आशेने पाहात वाटचाल केल्याशिवाय पर्याय नव्हता.
फोंड्याचे घर दोन वर्षांसाठी भाड्याने दिले. माझे पती विश्वास सोवनी घरात स्वयंपाकपाणी करून नोकरी सांभाळत होते आणि मी दीड वर्षाच्या मुलीला सासूकडे बेळगावला ठेवून मुलासह पुणे गाठले. तुषारला बालवर्गात दाखल करून मी शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण करू लागले. सोवनी घराचे हप्ते भरून आमच्या खर्चासाठी पैसे पाठवत होते व राहिलेल्या तुटपुंज्या रकमेत खर्चाची हातमिळवणी करत होते. १९८० मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मी बेळगावला सासूबाईंच्या मदतीसाठी धावले. तेथे माझे सासरे ब्रेन कॅन्सरने आजारी असल्याने माझी सासरी आवश्यकता होती. सासर्‍यांच्या अकाली निधनानंतर नोव्हेंबर १९८० मध्ये मी मुलांसह गोव्याला परतले.
पक्षी, प्राणी, वाहने, अंक यांची चित्रे व शब्द लिहिलेल्या पुठ्‌ठ्याच्या चिठ्‌ठ्यांचा आधार घेऊन व लीप रीडिंगचा उपयोग करून तुषारला मी घरी शिकवू लागले व सोवनी तुषारला घेऊन आपल्या शाळेत त्याला शिक्षणाचे धडे देऊ लागले. या काळात सोवनींनी तुषारबरोबरच इतर मूकबधीर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्याचा ध्यासच घेतला. गोव्यात विकलांगांसाठी शाळा सुरू व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केला. गोवा रेडक्रॉस, प्रोव्हेदोरिया, गोवा हिंदू असोसिएशन, समाजकल्याण खाते, शिक्षणखाते व मुख्यमंत्री, समाजकल्याणमंत्री यांना त्यांनी तेव्हा साकडे घातले. पणजी आकाशवाणी व वर्तमानपत्रांतील वाचकांच्या पत्राच्या सदराचा उपयोग करून घेऊन व नंतर दैनिक गोमन्तकमध्ये २५ जानेवारी १९८१ रोजी ‘मूकबधीरांची समस्या व शिक्षण’ या शीर्षकाखाली लेख लिहून आमच्या कुटुंबाची कर्मकहाणी वाचकांसमोर मांडली. हा लेख वाचून अनेक पालक त्यावेळचे ‘गोमन्तक’चे संपादक श्री. नारायण आठवले यांच्याकडे माझा पत्ता मागण्यासाठी भेटू लागले. श्री. आठवलेंना विकलांग मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या पालकांची केविलवाणी स्थिती प्रकर्षाने जाणवली. एके दिवशी आठवलेंनी पत्र लिहून आम्हा दोघांना भेटीसाठी ‘गोमन्तक’ दैनिकाच्या कार्यालयात बोलावले.
आम्ही आठवलेंची भेट घेऊन आमची कहाणी त्यांना सांगितली. विकलांगांसाठी शाळा सुरू झाल्यास मी तेथे शिकवण्यास तयार आहे असे वचन दिले. आमची सारी कहाणी ऐकून आठवले गहिवरले. ‘‘मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपण या मुलांच्या शिक्षणासाठी काही तरी करू’’ असा दिलासा त्यांनी दिला.
‘मूकबधीर व आंधळ्याची हाक’ ह्या शीर्षकाखाली आठवलेंनी अग्रलेख लिहून जागतिक अपंग वर्षात सरकार विकलांगांसाठी काही करू इच्छित नसेल, तर वर्तमानपत्राद्वारे लोकजागृती करून विकलांगांच्या शिक्षणासाठी विधायक सामाजिक कार्य उभे करण्याची आर्त हाक त्यांनी गोमंतकीयांना दिली. ‘वेध’ या सदरातून त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला व विकलांगांची नोंदणी सुरू केली. त्यानंतर पंधरा दिवसांत मोठा निधी उभा करून फोंडा येथे ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ या संस्थेची निवासी मूकबधीर शाळा सुरू केली. १६ ऑगस्ट १९८१ रोजी त्यांच्या वाढदिनी गोव्याचे त्यावेळचे नायब राज्यपाल श्री. जगमोहन यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन झाले.
लोकविश्वास प्रतिष्ठानच्या शाळेचे भव्य स्वरूप ही श्री. आठवलेंची व तुमच्या – आमच्या कार्याची पावती आहे. माझा मुलगा मॅट्रिक झाल्यावर त्याला स्वावलंबी करण्यासाठी बी. फार्म झालेल्या माझ्या मुलीच्या मदतीने आम्ही ‘वीणा मेडिकल्स’ची उभारणी केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर फार्मसी व्यवसायात यश गाठले. यापुढे आपल्या शाळेत मुलांच्या भवितव्यासाठी व्यवसाय शिक्षणाची सोय व्हावी, संस्थेच्या माध्यमातून सरकार दरबारी विकलांगांना नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शिवाय उद्योगधंदा, व्यवसाय सुरू करून मुले स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांमार्फत लघुुउद्योग उभारून गोवा बागायतदारसारख्या व्यापारी संस्थेमार्फत मालाच्या विक्रीसाठी व उत्पन्नासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही केलेल्या मार्गाने जिद्द, चिकाटी, प्रयत्न आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही, असे याप्रसंगी सांगावेसे वाटते.