वाहनाचा पाठलाग चुकवताना कार पाण्यात

0
7

>> सांतइस्तेव – आखाडा फेरी धक्क्यावरील घटना

>> कारमधील युवती बचावली, साथीदार बेपत्ता

एका अज्ञात गाडीकडून होणारा पाठलाग चुकवताना सांतइस्तेव आखाडा येथे फेरी धक्क्यावरून शनिवारी मध्यरात्री रेन्ट अ कार (जीए 03 डब्लू 8421) थेट पाण्यात गेल्याची घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेली युवती बचावली. मात्र, तिचा साथीदार बेपत्ता आहे. नौदलाचे पाणबुडे, अग्निशामक दल आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अपघातग्रस्त कार पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, तरुणीसोबत असलेला 22 वर्षीय बासुदेव भंडारी (गुजरात) हा तरुण गाडीत सापडला नाही.

नदीच्या पात्रात कार गेल्यानंतर कारमधील युवक व युवती हे दोघेही कारमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाली, अशी माहिती त्या युवतीने पोलिसांना दिली. पण, तिचा साथीदार अचानक गायब झाला आहे. त्यामुळे प्रकरणाचे गूढ कायम आहे.

साखळी येथील प्रीमिअर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणारी गुजरात येथील युवती आणि बासुदेव हा तिचा (गुजरात) साथीदार साखळी येथून पणजी येत असताना ही दुर्दैवी घटना घडली. माशेल येथे उत्तररात्री 1.25 च्या सुमारास त्यांच्या कारची आणि एका सेडान गाडीशी किरकोळ टक्कर झाली. त्यानंतर सेडान गाडीने त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कारगाडीचा पाठलाग केला जात असल्याचे त्यांना लक्षात येताच पाठलाग करणाऱ्या कारला चुकविण्यासाठी गुगल मॅपच्या आधारे रेंट अ कार जोरात चालविण्यास सुरू केली. कार सांतइस्तेव आखाडा येथे फेरी धक्क्यावर पोहोचल्यानंतर काळोखात समोरील रस्त्याचा अंदाज न आल्याने सदर कार थेट कुंभारजुवा नदीच्या पात्रात गेली.

तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, पणजीला जात असताना त्याच्या रेंट-अ-कारला मध्यरात्री माशेल येथे किरकोळ अपघात झाला. अपघातात किरकोळ नुकसान झालेल्या दुसऱ्या कारने या कारचा पाठलाग सुरू केला. कार फेरीधक्क्यावर पोहोचली तेव्हा घाबरलेल्या अवस्थेत, रस्ता नदीकडे जातो हे न समजता त्यांनी गाडी पुढे वळवली व त्यामुळे कार नदीपात्रात कोसळली.

युवती बचावली, युवक गायब
कार नदीत कोसळल्यानंतर मुलगी कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाली. तिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलगाही तिच्या पाठोपाठ कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला होता, परंतु ती नदीकाठी बाहेर आली तेव्हा त्याचा शोध लागला नाही. कारगाडीत बॅग, लॅपटॉप व इतर साहित्य सापडले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर युवती चालत परिसरातील एका घरात गेली आणि मदत मागितली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीस व अग्निशामक दलाच्या जवांनानी मध्यरात्रीपासून बचाव मोहीम सुरू केली होती. तथापि, काळोखात शोधमोहीम हाती घेणे शक्य झाले नाही. रविवारी सकाळी अग्निशामक दलाने कॅमेऱ्याच्या साहाय्याने नदीत शोधाशोध केली तेव्हा कार नदीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नौदलाचे पाणबुडे आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कार पाण्यातून बाहेर काढली.

साथीदाराचा शोध पण…

जुने गोवे पोलीस, अग्निशमन दल आणि भारतीय नौदलाचे पाणबुड्यांनी बेपत्ता भंडारीचा नदीच्या पात्रात आणि आसपासच्या भागात शोध घेतला. पण, त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. सदर युवती बासुदेव हा पाण्याबाहेर आल्याचे सांगत आहे पण तो बेपत्ता झाल्यामुळे गूढ वाढले आहे. माशेल अपघात प्रकरणाचा म्हार्दोळ पोलीस स्थानकाकडून तपास सुरू आहे. तर कार नदीत बुडण्याचे प्रकरण जुने गोवे पोलीस स्थानक हाताळत आहे.