>> सुरक्षादल – निदर्शकांतील संघर्षात 40 जखमी
मणिपूरमध्ये मवाहतूक सुरू झाल्यानंतर पहिल्याचदिवशी शनिवारी सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये संघर्ष होऊन झालेल्या हिंसाचारात ॉ 40 जण जखमी झाले. शनिवार दि. 8 मार्चपासून राज्यातील सर्व भागात सामान्य हालचाल पुन्हा सुरू झाली मात्र त्याला कुकी समुदायाच्या लोकांनी विरोध दर्शवला आहे.
शनिवारी सुरक्षा दलांच्या कारवाईच्या विरोधात कुकी-जो गटांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी कांगपोक्पी जिल्ह्यातील परिस्थिती तणावपूर्ण होती पण शांत होती. येथे अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निदर्शकांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. गोफणांचादेखील वापर करण्यात आला आहे. यात सुरक्षा दलाच्या 5 वाहनांच्या काचा फुटल्या. या संघर्षादरम्यान, 16 निदर्शक जखमी झाले आणि एका निदर्शकाचा दुखापतींमुळे मृत्यू झाला. आंदोलकांनी रस्ता रोखण्यासाठी दगडफेक केली. बस थांबवण्यासाठी झाडे तोडून रस्त्यावर टाकली. कुकी समुदायाने दगडफेक करून आणि टायर जाळून रस्ते रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली. बसेस उलटल्या गेल्या. यानंतर सुरक्षा दलांनी निदर्शकांवर लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
कुकी कौन्सिलने आपल्या प्रसिद्धिपत्रकात या संघर्षात 50 हून अधिक महिला जखमी झाल्या आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या बळाच्या वापरामुळे आमचा निर्धार आणखी दृढ झाला आहे. आम्ही सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करत असून परिषद मैतेई लोकांच्या मुक्त हालचालीची हमी देऊ शकत नाही. कोणत्याही अनुचित घटनेसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. समुदायात कायमस्वरूपी शांतता आणण्यासाठी राजकीय तोडगा निघत नाही तोपर्यंत सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला जाईल असे म्हटले आहे.
महामार्गावर गस्त
राष्ट्रीय महामार्ग-2 (इम्फाळ-दिमापूर रोड) वरील इतर भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाहनांची गस्त घातली जात आहे. कुकी-जो येथील संघटना असलेल्या द इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने कुकी-जो कौन्सिल (घनउ) ने पुकारलेल्या अनिश्चित काळासाठीच्या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.