वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली पर्यटकांची होतेय सतावणूक

0
6

>> आमदार मायकल लोबो, डिलायला लोबो व केदार नाईक यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

उत्तर गोव्यातील किनारी भागातील कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो आणि साळगावचे आमदार केदार नाईक यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन वाहतूक पोलिसांकडून तपासणीच्या नावाखाली पर्यटकांची केली जाणारी सतावणूक थांबविण्याची विनंती काल केली. एखाद्या पर्यटकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्यास त्याच्यावर कारवाई जरूर करावी; पण नाहक पर्यटकांना अडवून त्यांना सतावू नये, असे निवेदन या भाजपच्या तिन्ही आमदारांनी महासंचालकांना दिले.

राज्यात येणाऱ्या पर्यटकांची वाहतूक पोलिसांकडून सतावणूक केली जात आहे. पर्यटकांची सतावणूक त्वरित थांबविण्याची विनंती करण्यात आली आहे. एखादा पर्यटक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करावी; मात्र सर्रास पर्यटकांना तपासणीच्या नावाखाली अडवून त्यांची सतावणूक करू नये. गोव्यातील पर्यटकांची संख्या कमी होत चालली आहे. वाहतूक पोलिसांकडून सतावणूक झाल्यास पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील, असे मायकल लोबो यांनी सांगितले.

राज्यात वैध परवानाधारक 18 वर्षांवरील व्यक्तींनाच वाहने चालवण्याची परवानगी देण्यात यावी. गावामध्ये काही तरुण वाहन चालविण्याचा परवाना आणि हेल्मेटशिवाय दुचाकी वाहने चालवतात. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची गरज आहे, असेही लोबो म्हणाले. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणे शोधून त्यात सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

उत्तर गोव्यातील कळंगुट ते बागा या किनारी भागात पोलिसांकडून सहा ठिकाणी पर्यटकांना अडवून चलन दिले जात आहे. तसेच, जुने गोवे ते मंगेशीपर्यत पर्यटक गेल्यास त्यांना 9 ठिकाणी अडविले जाते. एका पर्यटकाला दिवसा एकदा चलन दिल्यानंतर पुन्हा त्यादिवशी चलन देता कामा नये, असेही मायकल लोबो यांनी सांगितले.