वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी किमान दंड १ हजार : वाहतूकमंत्री

0
119

वाढते रस्ता अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमात मोठे बदल करण्यात येणार असून कायद्याचे उल्लंघन करणार्‍याला कमीत कमी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल रस्ता व वाहतूक मंत्रालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना दिली.
मंत्री ढवळीकर यांनी राज्यातील वाहनांच्या वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. वाहतूक नियमांचे पालनाकडे वाहन चालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. वाहतूक नियमांचे पालन व्हावे म्हणून सरकारी यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहेत. वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी कमीत कमी दंडाची रक्कम १ हजार रुपये करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच अल्पवयीन वाहन चालकांकडून अपघात घडल्यास पालकांना जबाबदार धरले जाणार आहे. पाल्याबरोबरच पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यातील वाहनांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन पार्किंग, अपघात व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे डिसेंबरअखेरपर्यंत बुजविण्यात येणार आहेत. विविध भागातील रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी खास लाईन उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व इतर रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सहापदरी, आठ पदरी रस्ते बांधण्यासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत. पुलांची बांधकामे हाती घेतली जाणार आहेत, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.