वाहतूक नियमभंगप्रकरणी सहा महिन्यांत चालकांकडून 21.12 कोटींचा दंड वसूल

0
4

>> साडेतीन वर्षांत 62.65 कोटी रुपयांची वसुली

राज्यात नवीन वाहतूक नियमभंग दंडाच्या अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आल्यानंतर वाहतूक नियमभंग दंड वसुलीमध्ये मोठी वाढ झाली आहे. वर्ष 2023 मध्ये जानेवारी ते जून 2023 या सहा महिन्यांच्या काळात सुमारे 21.12 कोटी रुपये वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून दंडाच्या स्वरूपात वसूल करण्यात आले आहेत. राज्यात वाहतूक खात्याने मागील साडेतीन वर्षांत वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहनचालकांना दंड ठोठावून सुमारे 62.65 कोटी रुपयांची वसुली केली आहे.

राज्य सरकारने वाहतूक नवीन नियमभंग दंड रकमेची अंमलबजावणी करण्यास विलंब केला होता. अखेर, केंद्र सरकारच्या दबावामुळे नवीन नियमभंग दंडाची अंमलबजावणी सुरू करावी लागली. राज्य विधानसभेत आमदार विन्झी व्हिएगश यांनी वाहतूक नियमभंग दंड वसुलीबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली आहे. वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2020 मध्ये वाहतूक नियमभंगप्रकरणी 8 लाख 8 हजार 758 जणांना दंडाचे चलन जारी करून 9.99 कोटी रुपयांची वसुली केली. त्यानंतर वर्ष 2021 मध्ये 7 लाख 42 हजार 429 वाहन चालकांना वाहतूक नियमभंग प्रकरणी चलन जारी करून 9.98 कोटी रुपयांची वसुली केली. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन वाहतूक नियमभंग दंड आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात केल्यानंतर नियमभंगाच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे.