मडगाव (न. प्र.)
जनतेच्या हितासाठी सरकारतर्फे एक खिडकी योजनेची वारंवार घोषणा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात सुविधा बंद करून कटकटी सुरू केल्या जातात. मडगाव येथील जिल्हाधिकारी संकुलात नागरी सेवा केंद्र स्थापन करून तिथे वाहतूक खात्याची कचेरी आणली; पण ती पूर्णपणे न आणल्याने सर्वसामान्यांना जिल्हाधिकारी इमारत ते ओसिया इमारत ते आर्ले येथे वाहतूक कचेरीपर्यंत धावपळ करावी लागते.
पंधरा दिवसांमागे वाहतूक खात्याची कचेरी या नागरी सुविधा केंद्रात सुरू केली व दोन निरीक्षकांची नेमणूक केली. पण तेथे भल्या मोठ्या रांगा लागत असल्याने वाहन कर, ड्रायव्हिंग परवान्यासाठी फॉर्म मिळविण्यासाठी किमान दोन तास, त्यानंतर ते भरून पैसे भरण्यासाठी आणखी एक तास लागत आहे. हे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर, पुन्हा ऑसिया इमारतीतील वाहतूक कार्यालयात व आर्ले येथील कार्यालयात जावे लागते. आधी वाहतूक कार्यालयात हे काउंटर होते व तेथे दीड तासांत सोपस्कार पूर्ण करून घरी परत जाता येत असे. मात्र, सध्या दोन ठिकाणी पायपीट करावी लागते. दरम्यान, जनतेच्या जीवनाशी खेळणार्या या खात्याच्या कारभाराबद्दल आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी संताप व्यक्त केला आहे. काल आमदार रेजिनाल्ड यांनी जिल्हाधिकारी संकुलातील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली असता त्यांनी जनतेचे होणारे हाल बघून संताप व्यक्त केला. वाहतूक खात्याच्या संचालकांना फोन करून होणार्या बेशिस्त कारभाराची कल्पना दिली व वाहतूक कचेरी पुन्हा जुन्या जागेत नेण्याची मागणी केली त्यांनी केली.