वाहतूक कोंडी, कचरा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू

0
114
उमेदवारी अर्ज सादर करताना सिद्धार्थ कुंकळकर. सोबत दयानंद मांद्रेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर व मनोहर पर्रीकर. (छाया : नंदेश कांबळी)

भाजप उमेदवार कुंकळकर यांची ग्वाही
वाहतुकीची कोंडी व कचरा समस्या हे पणजी शहराला भेडसावणारे प्रमुख मुद्दे आहेत व ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे पणजी पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा तयार करण्याचे काम चालू असून वरील दोन्ही मुद्यांना त्यात सर्वांत वरचे स्थान देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पोटनिवडणुकीसाठीचा अर्ज आपण आजच भरला असला तरी प्रचार मात्र यापूर्वीच सुरू केला असून आतापर्यंत मतदारसंघातील सुमारे ८० ते ९० घरांना भेट देऊन प्रचार केल्याचे कुंकळ्येकर यांनी यावेळी सांगितले.माजी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या जागी भाजपने उमेदवार म्हणून तुमची निवड केली असल्याने त्याचे दडपण आहे काय असे विचारले असता पर्रीकर यांची जागा घेताना कुणावरही दडपण येणे हे स्वाभाविकच आहे. मात्र, आपण आमदार म्हणून निवडून आल्यास या पदास योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, गेली २७ -२८ वर्षे आपण राजकारणात आहोत. ज्या मतदारसंघातून एकदा निवडून आलेला उमेदवार परत येत नसे त्या मतदारसंघात लोकांनी आपणाला पाच वेळा निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
आता आपण केंद्रात गेलेलो असल्याने पणजीसाठी पर्यायी उमेदवार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धार्थ कुंकळयेकर यांचा भरघोस मतांनी विजय होईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सिद्धार्थ कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला

पणजी पोटनिवडणुकीसाठीचे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळकर यांनी काल सकाळी आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी, त्यांनी पणजीची ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मीचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्याबरोबर पणजी मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मुख्यमंत्री व सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, तसेच सुमारे १००-१५० कार्यकर्त्यांचा लवाजमाही होता. देवीच्या दर्शनानंतर सिद्धार्थ कुंकळकर व मनोहर पर्रीकर यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्ते मिरवणुकीने निर्वाचन अधिकार्‍यांच्या कार्यालयाजवळ आले. पणजी पोलीस स्थानकाजवळ त्यांना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर हेही येऊन मिळाले. वन व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा, कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर हेही यावेळी हजर होते.
संरक्षण मंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी यावेळी लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या मुख्यालयालाही भेट दिली. तद्पूर्वी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन सिद्धार्थ कुंकळकर व मनोहर पर्रीकर हे बाहेर आले असता मंदिराच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने एकच जल्लोष केला. यावेळी पणजी मतदारसंघातील कार्यकर्ते हजर होते.
‘ते वाघांनाच विचारा’ : पर्रीकर
विष्णू वाघ यांच्याशी संबंध ठेवू नका असे आपण भाजपच्या मंत्री व आमदारांना सांगितले हा वाघ यांचा आरोप खरा आहे का, असे विचारले असता, ‘ते वाघांनाच विचारा’ असे उत्तर काल संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. या वादावर भाष्य करणे त्यांनी टाळले.