पूर्वनियोजित दुरुस्ती कामाकरिता अटल सेतू सोमवारपासून पुन्हा बंद केल्यामुळे वाहनचालकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीचा आता रुग्णांनाही फटका बसू लागला असून, काल सकाळी 11 च्या सुमारास दोन रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या.
काल सकाळी 8 वाजल्यापासून पर्वरीतील पोलीस स्थानक ते मांडवीवरील दोन्ही पुलावर वाहनांच्या रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले. यावेळी वाहतूक पोलिसांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. केवळ साई सर्कल आणि पुलाकडील सर्कलजवळ मोजकेच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यामुळे वाहनांच्या कोंडीत अधिक भर पडत होती. त्यात अवजड वाहनेही दाखल झाल्याने कोंडीत अधिक भर पडली. या कोंडीत सकाळी 11 वाजता दोन रुग्णवाहिका सापडल्या. सुमारे अर्धा-पाऊण तास या रुग्णवाहिका कोंडीतून वाट काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. सकाळची वेळ असल्याने अनेक वाहने रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे या रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. पर्वरीतील अंतर्गत मार्गावरून काही वाहनचालकांनी आपली वाहने वळवल्यामुळे त्या रस्त्यांवर सुद्धा वाहतूक कोंडीचे दृश्य दिसून आले. आता अटल सेतू केव्हा वाहतुकीसाठी खुला होतो, याची प्रतीक्षा वाहनचालकांना लागली आहे.