वास्कोत सीएए समर्थनार्थ महारॅली

0
115

>> आमदार, मंत्र्यांसह १५ हजारांचा सहभाग

केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वास्को शहरात काढलेल्या महारॅलीत मुरगाव तालुक्यातून जनसागर लोटला होता. सुमारे पंधरा हजार नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

दि. ११ डिसेंबरला राष्ट्रपतींच्या संमतीनुसार लोकसभा व राज्यसभेत नागरिकत्वावर मोहर उमटवण्यात आली. याविषयी देशभर निदर्शने, समर्थनासाठी मोर्चे व निदर्शने करण्यात येत आहेत. वास्कोतही याचे पडसाद उमटले. वास्कोत या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पाचवेळा निदर्शने करून आवाज उठविला. दरम्यान या नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी काल रविवारी मुरगाव तालुक्यातील हजारो नागरिक एकत्रित येऊन त्यांना केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला आपले समर्थन दिले. यात राष्ट्रीय युवा हिंदू वाहिनी, विश्‍व हिंदू परिषद, वेटरन्स सोल्जर वेल्फेर असोसिएशन, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा गोवा तसेच सामाजिक संस्था, क्लब व इतर राष्ट्रप्रेमी नागरिक यांचा समावेश होता. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी महारॅली काढली. यामध्ये महारॅलीत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, तसेच माजी खासदार नरेंद्र सावईकर, फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, यांनीही आपला नागरिक या नात्याने सहभाग दर्शविला. काल रविवारी दुपारी ३.३० वा. वाडे मुंडवेल कदंब बसस्थानकाकडून महारॅलीला सुरुवात झाली. रॅली सरळ स्वातंत्र्यपथ मार्गे, आयओसी जंक्शन, एफएलगोम्स मार्गे मुरगाव नगरपालिकेसमोर आली. नंतर या महारॅलीचे येथील साईबाबा मंदिरासमोर सभेत रुपांतर झाले.

‘सीएए’ विरोधात
चिंबलमध्ये सभा

सांताक्रुझ गट कॉंग्रेस समितीतर्फे सीएए-एनआरसी दुरुस्तीच्या विरोधात चिंबल येथे निषेध सभा काल घेण्यात आली. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी सीएए-एनआरसी विरोधी आंदोलनाला पाठिंबा द्यावा अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सभेत करण्यात आली.