मुंडवेल वाडे वास्को येथील एका मोबाईल दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ३५ लाख रुपयांचे मोबाईल व इतर वस्तू चोरून नेल्या. सदर प्रकार काल सकाळी उघडकीस आला. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंडवेल वाडे वास्को गोवा शिपयार्ड जवळील एनआरबी नोबार्टस् जवळ असलेल्या सॅमसंग एम झोन या मोबाईल दुकानाचे चोरट्यांनी रात्री शटर वाकवून दुकानातून तब्बल ३५ लाखांचे मोबाईल संच व इतर वस्तू लंपास केल्या.
रविवारी रात्री दुकान मालकीण प्रिया साळकर दुकान बंद करून गेल्या व काल सकाळी त्या परत दुकानावर आल्या असता दुकानाचे शटर वाकवलेल्या स्थितीत आढळले. तसेच मध्यभागी असलेले कुलूप तोडले होते. त्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला असता दुकानातील मोबाईल संच व मोबाईलच्या इतर लहान वस्तू गायब झालेल्या दिसल्या. त्यांनी आपल्या पतीला फोन करून याविषयी माहिती दिली. तसेच वास्को पोलिसांनाही माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी आले. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पण त्याचा फायदा झाला नाही.
वास्को पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ, उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.