वास्कोत धावण्याच्या स्पर्धेद्वारे स्वच्छता जागृती

0
75

वास्को (न. प्र.)
मुरगाव पोर्ट ट्रस्टतर्फे धावण्याची स्पर्धा घेऊन ‘स्वच्छता सेवा जागृती’ मोहिमेची जनजागृती करण्यात आली. दहा किलोमीटर शर्यतीला नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते बावटा दाखवून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी एमपीटीचे अध्यक्ष जी. पी. राय व एमपीटीचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पाच किलोमीटर शर्यतीचा शुभारंभ एमपीटीचे अध्यक्ष जी. पी. राय यांच्या हस्ते करण्यात आला.
एमपीटीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळून सुरू झालेली शर्यंत हेडलॅन्ड सडा येथून वास्कोतील एक्सीस बँकेजवळ व तेथून परत एमपीटीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ आल्यावर शर्यतीची सांगता झाली. प्रमुख पाहुणे मंत्री मिलिंद नाईक यांनी यावेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल एमपीटीचे कौतुक केले.
या शर्यतीला एमपीटीचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, पोर्ट युजर्स व त्यांचे कुटुंबीय, वास्कोतील ज्येष्ठ नागरिक व मुरगांव तालुक्यातील इतरांनी स्वच्छता जागृती शर्यतीत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केला. या शर्यतीसाठी वास्को स्पोट्‌र्स क्लब व एमपीटीच्या अधिकार्‍यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची संकल्पना एमपीटीचे वरिष्ठ उपवाहतूक व्यवस्थापक जेरॉम क्लेमेंत यांची होती.
विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे वास्को येथील दी अनलिमिटेड डिपार्टमेंटल स्टोअर्सतर्फे पुरस्कृत करण्यात आली होती. सदर बक्षिसे अध्यक्ष जी. पी. राय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. दहा किलोमीटर शर्यतीत अमरनाथ एस., दनवीर सिंग, साहील शेख, डॉ. दिव्या हलदार, प्रा. ममता कुमारी व ऍड. स्पृक्षी कोठारे यांनी विजेतेपद पटाकावले.