वास्कोत दामोदर सप्ताहास प्रारंभ

0
140

>> कोरोना संकट दूर करण्याचे श्रीचरणी गार्‍हाणे

वास्कोचे ग्रामदैवत देव दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून १२१ व्या अखंड २४ तासांच्या वार्षिक दामोदर भजन सप्ताहाची काल रविवारी प्रारंभ झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा सप्ताह सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचे समितीने ठरवले असून काल प्रथमच १२१ वर्षांच्या इतिहासात सप्ताहाची सुरुवात भाविकांना प्रवेश न देता झाली. जोशी कुटुंबातील प्रशांत जोशी यांच्या हस्ते श्रीचरणी श्रीफळ अर्पण करण्यात आला. यावेळी जोशी कुटुंबातील काही सदस्य, समितीचे काही पदाधिकारी उपस्थित होते. श्रीफळ अर्पण केल्यानंतर अखंड २४ तास भजनाची सुरुवात अशोक मांद्रेकर (शिवोलकर) यांच्या गायनाने झाली.

जगावरील कोरोना महामारीचे संकट दूर करावे असे गार्‍हाणे मुख्य पुरोहित भूषण जोशी यांनी दामोदर चरणी घातले. यावेळी मंदिरात कोणीही दर्शनासाठी येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिसांमार्फत वाहनांना बंदी घालण्यात आली होती. अनेकांनी मंदिराच्या बाहेरूनच श्रींचे दर्शन घेतले.

यंदा कोरोनामुळे विविध समाजातील पौराणिक ‘पार देखावे’ मंदिरात आले नाहीत. त्यामुळे मुरगाव पत्तनन्यास कामगार संघटना, दैवज्ञ ब्राह्मण समाज, नाभिक समाज, विश्वकर्मा समाज, बाजारकर समिती, ओवळेश्वर गाडेकर समाज सदस्यांनी तळी श्रीचरणी अर्पण केली. आज दुपारी श्रीफळ वास्को खारीवाडा समुद्रात विसर्जन केले जाईल.