वास्कोत चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार

0
7

>> एक पोलीस जखमी; तिघे चोरटे पसार; नागरिकांच्या सतर्कतेनंतर पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न पाडला हाणून

झुआरीनगर, वास्को येथील एमईएस महाविद्यालय परिसरातील एका बंगल्यात रविवारी मध्यरात्री 2 वाजता चोरीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर तीन चोरट्यांनी पळून जात असताना पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, ज्या बंगल्यात ही चोरी घडली, ते ठिकाणी वेर्णा पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येते; मात्र त्याची कल्पना नसल्यामुळे नागरिकांनी या चोरीच्या प्रकाराची कल्पना वास्को पोलिसांना दिली. वास्को पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता आणि कार्यक्षेत्राचा विचार न करता तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

मिळालेल्या माहितीनुसार, झुआरीनगर येथे एमईएस महाविद्यालय परिसरात ही घटना घडली असून, एका बंगल्यात मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तीन चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या बंगल्याच्या शेजारील लोकांना याची चाहूल लागली असता लगेच त्यांनी वास्को पोलिसांना याविषयी माहिती देताच वास्को पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच घाबरलेल्या चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याचवेळी चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे झुआरीनगर परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वास्को व वेर्णा पोलिसांकडून चोरट्यांचा कसून तपास सुरू आहे.

श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण
वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियस आणि पोलीस पथकाने त्वरित घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना बोलवून तेथे असलेले पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनास्थळावर पिकास, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, फोडलेली कुलूपे आणि एक बॅग सापडली. या प्रकरणी अधिक तपास वेर्णा पोलीस करीत आहेत.

‘ते’ कुटुंब युकेमध्ये स्थायिक
सदर बंगला डॉ. आमोणकर नामक व्यक्तीचा असून, त्यांचे कुटुंब युकेमध्ये स्थायिक आहे. रविवारी मध्यरात्री बंगल्यात कोणीही नव्हते. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे, तसेच वास्को पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, यशवंत देसाई, कॉन्स्टेबल प्रल्हाद नाईक यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला.

तीन वर्षांपूर्वीही झाला होता चोरीचा प्रयत्न
तीन वर्षांपूर्वीही याच बंगल्यात खिडकीचे ग्रील्स काढून आतमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यावेळी पोलीस तक्रार करण्यात आली होती; मात्र चोरटे हाती लागले नव्हते.

पोलीस कारवाईचा घटनाक्रम

पोलीस घटनास्थळी : वास्को पोलिसांना झुआरीनगर येथे एमईएस महाविद्यालयाजवळ एका बंगल्यात आवाज येत असल्याचा फोन आला, तेव्हा रात्रपाळीत पोलीस पेट्रोलिंग करत असलेले पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक हे कॉन्स्टेबल यशवंत देसाई व प्रल्हाद नाईक यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले.

विशेष खबरदारी : पोलीस आल्याची चाहूल चोरट्यांना लागू नये म्हणून स्वप्नील नाईक यांनी आपली गाडी एमईएस जंक्शनवर बंगल्यापासून 700 मीटर लांब ठेवून तिथे कॉन्स्टेबल प्रल्हाद नाईक यांना गस्तीवर ठेवले.

दोघे चोरटे आत; एक बाहेर : स्वप्नील नाईक व यशवंत देसाई हे चालत बंगल्याकडे गेले. त्यावेळी डॉ. आमोणकर यांच्या बंगल्यात घुसून चोरी करण्यासाठी दोघे चोर आत दरवाजा फोडण्याच्या प्रयत्नात होते, तर एक चोरटा बाहेरील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बंगल्याबाहेर उभा होता.
दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न :
अचानक पोलीस येत असल्याचे बंगल्याबाहेरील चोरट्याला दिसून येताच त्याने अन्य दोघा चोरट्यांना कळवले. त्या दोघांनी बंगल्याच्या कुंपणावरून बाहेर उडी मारून त्यांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

बंदुकीची गोळी माथ्यावरून गेली : चोरट्यांना पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न करताच एका चोरट्याने पोलिसांवर पिस्तुलाने गोळी झाडली. त्यात सुदैवाने स्वप्नील नाईक हे बचावले.

पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न : यावेळी मुख्य स्त्यावर पाळत ठेवून उभ्या असलेल्या प्रल्हाद नाईक यांनी भरवेगाने दुचाकीवरून येत असलेल्या चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

‘उसके उपर गोली मार’ : यावेळी दुचाकी चालवत असलेल्या चोरट्याने पाठीमागे बसलेल्या त्याच्या साथीदाराला ‘उसके उपर गोली मार’ असे हिंदीतून सांगितले.

अन्‌‍ एका पोलिसाला लागली गोळी :
प्रल्हाद नाईक यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर एका चोरट्याने गोळी झाडली. चोरट्यांने झाडलेली गोळी जमिनीवर आपटून नाईक यांच्या गुडघ्याला लागली.

अन्‌‍ चोरटे पसार : गोळीबारानंतर दोघे चोरटे भरवेगाने दुचाकीवरून पळून गेले. तिसरा चोरटाही झाडीतून पसार झाला.