कोळसावाहू ट्रकखाली चिरडून वास्कोतील नामवंत त्रियात्रिस्ट मार्सेलीन दि बेली रॉड्रीगीस (६४) यांचा दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. एमपीटीमधून होणारी कोळसा वाहतूक तसेच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची लोकांनी जोरदार मागणी केली आहे.
येथील भाजी मार्केटजवळ एफ. एल. गोम्स राष्ट्रीय मार्गावर काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान एमपीटीमधून कोळसा वाहतूक करणार्या (जीए ०९ यू ३५६१) या ट्रकची याच मार्गाने जाणाच्या तयारीत असलेल्या (जीए ०६ सी ३३०० डियो) या दुचाकी चालक तियात्रिस्ट मार्सेलीन यांना धडक बसल्याने ते खाली कोसळले व ट्रकचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. यावेळी त्यांच्या डोक्यावर हेल्मेट होते. मार्सेलीन हे फुलांच्या दुकानावर फुलांची ऑर्डर देण्यासाठी आले होते. उद्या त्यांच्या दिवंगत पत्नीचे वर्ष असल्याने त्यांची ही तयारी चालू होती. मात्र काळाने त्यांच्यावर आघात केला.