वासुदेवः सर्वं इति स महात्मा सुदुर्लभः

0
376

प्रा. रमेश सप्रे

काही शब्दांना स्वतःचं असं वजन नि वलय असतं. हे त्यांना त्यांचा अर्थ, त्यांचा उपयोग त्याबरोबरच त्यांचं जीवनातलं प्रकटीकरण यामुळे प्राप्त होतं. साधु-संत-महात्मा हे असेच शब्द आहेत. कान ऐकतात नि मन नमतं. आपोआप डोळे मिटले जातात नि दर्शन होतं नि बुद्धी सांगते .. जा शरण .. कर समर्पण नि स्मरण!

अशा शब्दांचा अर्थ शब्दकोशात पाहायचा नसतो. तेथे तो अगदी बेरंग व निरसही वाटतो. पण आपल्या जीवनकोशात ज्यावेळी अशा शब्दांचे अंकुर पालवायला लागतात नि स्फुल्लिंग (ठिणग्या) तेजाळायला लागतात त्यावेळी जीवन धन्य करणारा अनुभव येतो.
गीतेत भगवंत ‘महात्मा’ या शब्दाचं असं दिव्य प्रकटीकरण करताहेत. सर्वांना ‘महात्मा’ बनण्याची प्रेरणा देतानाच हे काम अवघड आहे याचीही कल्पना देताहेत. पण त्यापूर्वी साधु-संत या शब्दांबद्दल प्रत्यक्षात तसे असलेल्या महान व्यक्तींची काय कल्पना आहे ते पाहू या.
तुकोबा स्वतः साधुपुरुषच होते. ‘साधु’ शब्दाचा महिमा व गरिमा(वलय व वजन) व्यक्त करताना ते जे सांगतात ते त्यांचं आत्मचरित्रच होय. साधुत्वाचं महत्त्वाचं लक्षण सांगताना म्हणतात- ‘जे का रंजले गांजले| त्यासि म्हणे जो आपुले| तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा॥ या वचनातील ‘च’कार (तोचि साधु नि तेथेचि देव) हा तुकोबांचा आत्मप्रत्यय (स्वानुभव) होता. रंजलेले, गांजलेले, पिडलेले, त्रासलेले असंख्य आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटत असतात. काय करतो आपण त्यांच्यासाठी? साध्या राष्ट्रीय आपत्तीत सापडलेल्या (भूकंप, वादळ, पूर, दुष्काळ, इ. इ.) आपल्या देशबांधवांसाठी एका दिवसाचा पगार देताना आपण किती कातावतो – वैतागतो! अशा परिस्थितीत अशा दुर्दैवी लोकांना ‘आपलं म्हणणं’ – आपुलकीनं त्यांची सेवा करणं, त्यांच्यासाठी त्याग करणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सर्वांच्यात असलेल्या परमेश्‍वराची आपल्याला आतून जाणीव होईल.
तुकोबा पुढे म्हणतात .. ‘दया करणे जे पुत्रांसी| तेचि दासा आणि दासी| तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा॥ – इथंही पुन्हा ‘च’कार आहेच. मुलांवर प्रेम कसं व किती करायचं याचं काही गणित मांडता येत नाही. पशुपक्ष्यांपासून गरीब-श्रीमंत; शिक्षित-अशिक्षित; शहरी-ग्रामीण अगदी झोपडपट्टी निवासी ते भिकार्‍यापर्यंत सर्वजण आपल्या मुलांवर निखळ प्रेम करत असतात. पण ज्यांची सेवा करायला आजुबाजूला दासदासी, नोकर-चाकर असतात त्यांच्याशी अशा लोकांचं वर्तन कसं असतं? इथंच सामान्य व्यक्ती व साधुपुरुष यांच्यातला भेद स्पष्ट होतो. आप-पर म्हणजे माझा-तुझा. आपला (बाळ्या) व इतरांचा (कार्टा) असा भेद सर्वसामान्य जनांच्या मनाजीवनात असतोच असतो. पण या शरीरसंबंध नि हितसंबंध यांच्यातून निर्माण झालेल्या भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांशी विशेषतः आपल्या सेवक-सेविकांशी जो पुत्रवत् स्नेहाने व्यवहार करतो त्यांना आपलं अगदी आतलं मानतो तोच साधू होय. हेही तेव्हाच जमेल जेव्हा सर्वांच्यात वसणारं दिव्य चैतन्य जाणवेल.
याहिपुढे जाऊन तुकोबा सांगतात .. ‘ज्यासि आपंगिता नाही| त्यासी धरी जो हृदयी| तोचि साधु ओळखावा| देव तेथेचि जाणावा॥ ज्याला कोणताही आधार नाही, जो सर्वार्थानं अपंग आहे त्याला जो नुसतं जवळ करत नाही तर त्याची प्रेमानं सेवा करतो, त्याला हृदयापाशी धरतो.. त्यांच्या दुःखांशी समरस होऊन ती दूर करण्याचा प्रयत्न करत राहतो तो सेवाव्रतीच खरा साधु. देवदर्शनही त्याच्यातच होते. जो साधु तोच देव हे सांगताना तुकोबा केवढी प्रेरणा देऊन जातात. साधूत्वातून देवत्वाकडे म्हणजेच सेवेतून दिव्यत्वाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. स्वतःच्या जीवनातून सेवा हीच साधना, मानवसेवा हीच देवभक्ती हे तत्त्व शिकवून जातात.
‘साधू’ शब्दाइतकाच उदात्त अर्थ असलेला शब्द – ‘संत’! समर्थ रामदास स्वामी हे स्वतः संतच होते. त्यांनी ‘मनाचे श्‍लोक’ या अप्रतिम आत्मचरित्रात्मक रचनेत ‘संत’ या शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी स्पष्ट केलाय. ‘करी वृत्ति जो संत तो संत जाणां’ असं ते एके ठिकाणी म्हणतात. ‘संत’ या शब्दाचा अर्थ सत्य, सतत, संतत टिकणारं असं तत्त्व. कोणतंही तत्त्व व्यक्त होतं विचार-उच्चार-आचार या माध्यमातून. यालाच दृष्टी-वृत्ती-कृती असंही म्हटलं जातं. म्हणजेच ज्याचे विचार शुद्ध, स्पष्ट आहेत, ज्याचे शब्द आत्मविश्‍वासपूर्ण आहेत नि ज्याची प्रत्येक कृती इतरांसाठी आश्‍वासक, मार्गदर्शक आहे अशी व्यक्ती म्हणजे ‘संत’. सर्वांच्या कल्याणाची, अखिल सृष्टीच्या हिताची भावना मनात दृढ झाल्याशिवाय नि त्यानुसार जीवन जगल्याशिवाय ‘संत’ बनता येत नाही. असं तेव्हाच शक्य आहे जेव्हा ‘हे विश्‍वचि माझे घर| अशी मती जयाची स्थिर| किंबहुना चराचर| आपणचि जाहला॥ – असं जगणं सुरू होतं. इथं केवळ ‘सहानुभूती (सिंपथी)’ उरत नाही तर ‘समानभूती (एंपथी)’ निर्माण होते. संतपणाचा उदय होतो. अशी व्यक्ती सर्वांसाठी पूज्य बनते; अन् अशा व्यक्तीसाठी सर्वजण ईश्‍वररूपच बनून जातात. अशा व्यक्तींचा प्रत्येक उद्गार ही मानवतेची आरती असते; त्यांची प्रत्येक हालचाल ही अखिल मानवजातीला प्रदक्षिणा असते तर प्रत्येक कर्म-कृती ही सर्वांची पूजा असते. त्यांना (संतांना) सारे पूजनीय मानतात तर संत सर्वांना पूज्य मानतात. केवळ मानतच नाहीत तर त्याप्रमाणे जगत राहतात.
संतांना सर्वत्र परमेश्‍वरी सत्तेचा नि शक्तीचा विलास अनुभवाला येत असल्यामुळे सारेच ‘आपले’ वाटतात. ‘परका’ कोणी त्यांच्या राज्यात नसतोच. याचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्यांच्या मनाजीवनातून भय – चिंता यांचं पूर्ण उच्चाटन होतं. एरवी ‘भय इथले संपत नाही’ हा सर्वांचा नित्य अनुभव असतो. समर्थ रामदास हाच भाव किती प्रभावीपणे व्यक्त करतात- ‘भयें व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे| भयातीत तो संत आनंत पाहे॥ संपूर्ण भयातीत, भयाच्या पलीकडे गेलेला महापुरुष म्हणजेच ‘संत’! आपण दूरदर्शनच्या ‘डिस्कव्हरी’, ‘ऍनिमल प्लॅनेट’ यासारख्या वाहिन्या पाहिल्या तर सारी जीवसृष्टी एकाच वेळी सामंजस्य (परस्पर पूरकता) नि महाभयानं कशी व्यापलेली आहे हे दिसून येते. त्या हरणांचे निरागस डोळे, त्या पक्ष्यांचे भोळे डोळे, सार्‍या जीवांच्या डोळ्यात तर भय दिसतंच पण त्यांचे कान, चेहरे, त्वचा सार्‍यातून भीतीच सरसरत जाताना दिसते. पण माणूस सोडून सारेजण प्रकृतीच्या पातळीवरच जन्मतात – जगतात नि मरतात. म्हणून गीता ही कृष्णार्जुनांच्या रथाच्या घोड्यांसाठी नसते. त्याचप्रमाणे गीतोपदेश हा कुरूक्षेत्रावर उपस्थित असलेल्या हत्तीसारख्या महाकाय पशूंसाठी नसतो. पण त्या रणांगणावर उपस्थित असलेल्या पदाती (पायी लढणार्‍या) सैनिकापासून ते अतिरथी – महारथींपर्यंत सर्वांसाठी गीतेतील समुपदेशन आवश्यक असतं. एवढंच नव्हे तर जखमी सैनिकांना उपचारासाठी शिबिरात नेणारे, मृत सैनिकांचा अंत्यसंस्कार करणारे, सैन्याला अन्नपाणी पुरवणारे सारे सेवक जे अखंड कार्यरत असतात त्या सर्वांसाठी गीता महत्त्वाची असते. अर्थात सर्वांना ऐकण्यासारखी परिस्थिती नसते याहिपेक्षा सर्वांची मनःस्थिती गीता ऐकण्याच्या अवस्थेत नसते ही गोष्ट मात्र खरी असते.
आपल्या भाग्यानं आपल्याला गीता शांतपणे पुनःपुन्हा वाचण्याची संधी मिळते – भगवंताची दिव्य वाणी कानातून मनात साठवून तिचं पुनःपुन्हा चिंतन-मंथन करणं शक्य असतं हाच अनुभव संजयानं गीतेच्या शेवटी व्यक्त केलाय. तो दिव्य संवाद, ते अद्भुत विश्‍वरूप पुनःपुन्हा (मुहुर्मुहुः) आठवून तनमन रोमांचित होतंय असा स्वानुभव संजय व्यक्त करतोय. आपणही तोच अनुभव घेत भगवंताच्या वाणीचा नि समुपदेशनाचा लाभ घेतोय.
साधु-संत होणं अत्यंत अवघड असलं तरी अशक्य अजिबात नाही असं सांगण्याचा भगवंताचा गीतेत प्रयत्न आहे. प्रत्येक व्यक्तीत साधुत्वाचं किंवा संतपणाचं बीज आहे. यासाठी एक अगदी सोपा (वरवर) दिसणारा उपाय भगवंत सांगताहेत. त्यांचा शब्द आहे ‘महात्मा’. कुणाला महात्मा म्हणायचं नि मानायचं? यावर त्यांचं म्हणणं आहे – ‘वासुदेवः सर्वम् इति स महात्मा’ म्हणजे हे जे सारं आहे – आपल्याला जे सर्व दिसतं, आपल्या अनुभवाला येतं, सर्व इंद्रियांतून तसेच मनबुद्धीतून जे आपल्या अगदी आत शिरतं ते सारं ‘वासुदेव’च असतं. त्यात भगवंताचं दिव्यत्व असतं. हे नुसतं समजून-उमजून घ्यायचं नाही तर त्याप्रमाणे आपल्या सार्‍या क्रिया-प्रतिक्रिया-आंतरक्रिया (इंटरऍक्शन) म्हणजेच आपलं सारं वर्तन (बिहेवियर) करायचं म्हणजेच ‘अखंड वासुदेव भावातच’ जगायचं हे भगवंताना अपेक्षित आहे. हे जमेल तो महात्मा पण आपण जमवायचा प्रयत्न तरी केला पाहिजे एक साधक म्हणून – अध्यात्माचा विद्यार्थी म्हणून – गीतेचा शुभार्थी (कौन्सेली) म्हणून! म्हणजे निश्‍चित काय करायचं? हा विषय तसा नवा नाही नि हा मार्गही तसा नवीन नाही. पण पुनःपुन्हा विचार करून जीवनाची दिशा नि दशा बदलण्याचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. अगदी ‘महात्मा’ जरी एकदम नाही तरी सामान्य ‘मृतात्मा’ म्हणूनही मरत मरत जगत राहाणं मानवजन्माला शोभत नाही.
अगदी दैनंदिन जीवनासाठी कार्यक्रमाचा म्हणजेच जीवनशैलीचा विचार करता येईल. ‘वासुदेवः सर्वम् इति’ .. हे जे सारं आहे, अनुभवाला येतंय ते ‘वासुदेवमय’ आहे एवढंच नव्हे तर ते ‘वासुदेव’च आहे असं मानून जगणं आवश्यक आहे.
‘वासुदेव’ या शब्दाचा साधासुधा अर्थ आहे सगळीकडे ‘वसून राहिलेला देव’. पृथ्वीच्या आठ दिशांचे स्वामी ‘अष्टवसू’ आहेत असं आपण मानतो. म्हणून पृथ्वीला वसुधा, वसुंधरा, वसुमती अशी नावं आहेत. या आठ दिशांच्या वसूंचाही जो देव तो वासुदेव. महाभारतात हा अर्थ तर ‘वासुदेव’ शब्दाचा आहेच पण अगदी शब्दार्थ म्हणजे वसुदेवाचा पुत्र वासुदेव ‘कृष्ण’ हा ही आहे. पण त्याचबरोबर शिशुपाल, पौंड्रक देशाचा राजा व स्वतः श्रीकृष्ण यांच्या ‘वासुदेव’ पदासाठी स्पर्धा होती असाही उल्लेख आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान ही जशी ‘पदं’ आहेत तसंच सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च, सर्वोत्तम वासुदेवपद! वासुदेवाचा ‘सत्ता’ सर्वांवरच असते. वासुदेवाची ‘लीला’ म्हणजे सर्व चराचर विश्‍वातील घटना; वासुदेवाची ‘क्रीडा’ म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातील शुभाशुभ प्रसंग; वासुदेवाची ‘इच्छा’च सार्‍या विश्‍वात प्रभावी कार्यरत असते. याची जाणीव म्हणजे ‘वासुदेव सर्वम्’ ही वृत्ती व त्यानुसार प्रत्येक कृती.
तसं पाहिलं तर ‘सर्व’ हे विष्णुसहस्त्रनामातील समजायला व अनुभवाला सर्वांत सोपं नाम आहे. सर्वेश, सर्वेश्‍वर ही या ‘सर्व’चीच रुपं आहेत. पण सर्व म्हणजे सर्व! ऑल मान्स ऑल! अशा सर्व स्थळी-काळी-सर्व वस्तु, पशुपक्षी वनस्पती व व्यक्ती, सर्व कृती व सर्व घटनाप्रसंग यात परमेश्‍वर(वासुदेव) आहे हा भाव म्हणजे ‘वासुदेवः सर्वम् इति|’ रामकृष्ण परमहंस मार्मिकपणे म्हणायचे ‘या ज्ञानी लोकांचं सर्व नेति नेति (न इति न इति) त्यापेक्षा आम्हां भक्तांचं बरं – सारं काही इति इति’. याचा अर्थ – हे म्हणजे ब्रह्म नाही (न इति)… ते म्हणजेही ब्रह्म नाही (न इति) असं अखंड नेति नेति करत जीवन घालवायचं. एखाद्यालाच आतून जाणवेल .. अनुभवाला येईल की या सार्‍यांच्या पलिकडे ‘आहे’ ते ब्रह्म जे शब्दात सांगता येत नाही, रंगात रंगवता येत नाही, सुरात गाता येत नाही की हालचालीतून नाचता येत नाही… ज्याला ना गंध, ना रंग, ना रूप, ना स्पर्श, ना रस… आहे फक्त शुद्ध अस्तित्व ज्याचा फक्त अनुभव घेता येतो. केव्हा? तर स्वतः ब्रह्मरूप झाल्यावरच ‘अहं ब्रह्मास्मि’ हा सुद्धा अवचनीय-अकथनीय-अवर्णनीय आनंद स्तब्ध नि मौन, निःशब्द! हे काही सामान्य माणसाचं काम नव्हे.
भगवंतांनी सर्वसामान्यांसाठी हे सूत्र व हा मंत्र दिलाय – वासुदेवः सर्वम् इति! याचा अखंड बोध म्हणजे ज्ञान; अखंड भाव म्हणजे भक्ती; अखंड भान म्हणजे कर्म नि अखंड अनुभव म्हणजे ध्यान! बस् गीतेच्या दृष्टीनं आपल्या जीवनाचे हे चार महत्त्वाचे पैलू ज्ञान-भक्ती-कर्म व ध्यान. या सार्‍यातून ‘वासुदेवः सर्वम् इति’चा अखंड, अक्षय आनंद घेत राहणं म्हणजे धन्य जीवन.. मुक्त जीवन.. ..जीवनमुक्ती!
* दिवसाच्या सर्व काळी व आयुष्याच्या सर्व अवस्थेत सगळीकडे – सगळ्यांच्यात ‘वासुदेव’ म्हणजे ईश्‍वरी चैतन्य आहे याचा आनंदानुभव घेत राहिलं पाहिजे.
* जगातील, संसारातील सर्व ठिकाणी परमेश्‍वराचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. देवालयात तसंच शोचालयातही; गंगोदकात तसंच गटारातील पाण्यातही; पवित्र सोवळ्यात(वस्त्रात) तसंच दारातल्या पायपुसण्यातही. अशा सर्व स्थानी ईश्‍वरी अस्तित्व जाणवलं पाहिजे.
* कोणताही पशु पवित्र वा अपवित्र नाही – गरूड विष्णूचं वाहन असला तरी गिधाड जटायूला विष्णूच्या (श्रीरामाच्या) मांडीवर मुक्ती मिळालीय; ती गाय अति पवित्र, पूजनीय वाटली तरी बळी दिला जाणारा तो रेडा – तो बोकड – तो कोंबडाही कमी पवित्र नाहीत! ही दृष्टी मात्र असायला हवी. मोर हे सरस्वतीचं वाहन म्हणून वंदनीय वाटलं, कृष्णाचा मुकुट म्हणून मोरपीस पवित्र वाटलं तरी सर्वांना हवी असलेल्या लक्ष्मीचं वाहन ‘घुबड’ हे अशुभ नाही. कोकिळेचं कुहू कुहू, पपीह्याचं पिहू पिहू नि घुबडाचं घूऽऽ घूऽऽ सारखंच वाटलं पाहिजे… ॐकार ध्वनीसारखं!
– गोड आंब्याची पानं म्हणून घटावर ठेवायची, तोरण म्हणून दारावर बांधायची तशीच कडुनिंबाची कडुझार पानं गुढीबरोबर वर वर चढवून पुजायची.. हीच ती ‘वासुदेवः सर्वम् इति’ ही दृष्टी… माणसांच्यात तर सज्जनांपेक्षा दुर्जनात, पुण्यवानांपेक्षा पापीपतित लोकात अधिक विष्णुदर्शन झालं पाहिजे.
* कोणतीही कृती शुद्ध वा अशुद्ध वा निषिद्ध नाही…. आध्यात्मिकदृष्ट्या सारे घटना-प्रसंग त्या वासुदेवाचीच ‘इच्छा’ म्हणून घडतात. या सर्वांना वासुदेव मानून जगणं हीच सहज साधना – अनंद साधना. सर्वच वासुदेव हा बोध – हा भाव नि हा अनुभव घेत राहू या. महात्मा बनण्याचं त्या वासुदेवावरच सोपवू या!