वाळू उत्खननासाठी अर्ज मागवले

0
4

>> मांडवी, झुवारी नदीत वाळू उपसा सुरू करणार

राज्यातील मांडवी आणि झुवारी नदीच्या पात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी कायदेशीर मान्यता दिली जाणार असून खाण खात्याने वाळू उत्खनन करण्यासाठी संबंधितांकडून अर्ज मागवले आहेत. पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खनन करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहेत.

राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून मांडवी आणि झुवारी नदीत वाळू उत्खनन करण्यासाठी पर्यावरण दाखला मिळाला आहेत. राज्य सरकारच्या खाण खात्याकडून कायद्याच्या चौकटीत राहून वाळू उत्खनन करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. राज्यात वाळू उत्खनन करण्यावर बंदी असल्याने परराज्यातून वाळू आणावी लागत आहे. राज्यातील नद्यांमध्ये वाळू उत्खनन करण्यासाठी मान्यता नसताना अनेक ठिकाणी बेकायदा वाळू उत्खनन केले जात होते. तथापि, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या बेकायदा वाळू उत्खननाची गंभीर दखल घेतल्यानंतर प्रशासनाने बेकायदा वाळू उत्खनन बंद पाडले आहे.

राज्य सरकारच्या खाण खात्याने एनआयओ या संस्थेच्या माध्यमातून मांडवी, झुवारी नदीमध्ये सर्वेक्षण करून वाळू उत्खनन करण्यासाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. खाण खात्याने वाळू उत्खनन करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्याला पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून मान्यता घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कायदेशीर वाळू उत्खनन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाळू उत्खनन करण्यासाठी अर्ज मागविले असून अर्ज सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.