वाळपई-होंडा मार्गावरील अपघातात तरुण ठार

0
22

वाळपई होंडा मार्गावर सालेली या ठिकाणी दुचाकीने (जीए 04 पी 6055) दगडी कुंपणाला धक्का दिल्यामुळे हेदोडे सत्तरी येथील नेहाल उल्हास गावडे (22) या तरुणाचे निधन झाले. सदर अपघात गुरुवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी नेहाल यास वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचे निधन झाले. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर असलेल्या म्हशींमुळे हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

नेहाल हा आपल्या दुचाकीने होंडा भागातून वाळपई शहराकडे येत होता. सालेली या ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या म्हशी त्याला उशिरा दिसल्या. त्यामुळे त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व डाव्या बाजूला असलेल्या दगडी कुंपणाला गाडीने धडक दिली. यावेळी त्याच्या डोक्याला जबर जखम झाली. स्थानिकांनी 108 सेवांतर्गत त्याला वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात दाखल केले मात्र डोक्याला जवळ जखम झाल्यामुळे रुग्णालयात पोचण्यापूर्वी त्याचे दुर्दैवी निधन झाले.
दरम्यान स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेहल गावडे हा पणजी येथील पासपोर्ट कार्यालयात अवघ्या दिवसांपूर्वी कामाला लागला होता. दररोज दिवशी तो आपली दुचाकी घेऊन कामाला जात होता.

या संदर्भाची माहिती मिळतात वाळपई पोलिसांनी पंचनामा केला. नेहाल गावडे याच्यावर आज शुक्रवारी सकाळी उत्तररीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी नेहाल गावडे याच्या डोक्यावर हेल्मेट नव्हते.

अपघातासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार दोन म्हशी परस्परांमध्ये झंजत होत्या. त्यांचा नेहल याला अंदाज आला नाही. जसा तो जवळ गेला त्यावेळी त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले व बाजूच्या दगडी कुंपणाला गाडीने धडक दिली.