वाळपई पाठोपाठ सांगेतही १०० इंच पाऊस

0
130

राज्यात मोसमी पावसाने इंचाचे शतक अद्याप गाठलेले नसले तरी, वाळपई पाठोपाठ आता सांगे तालुक्यात मोसमी पावसाने इंचाची शंभरी गाठली आहे. वाळपई येथे आत्तापर्यंत १२५. २८ इंच आणि सांगे येथे १००.१२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासात सांगे येथे २ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंडा येथे साधारण १ इंच तर इतर भागात किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत ८४.६४ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मोसमी पाऊस कमजोर झाल्याने पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा साधारण १५ टक्के कमी आहे. तीन चार दिवसांपूर्वी चांगला पाऊस पडला. त्यानंतर मागील तीन दिवस पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी नोंद झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत मुरगाव येथे सर्वांत कमी ७०.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे.