वाळपई, पर्येतून भाजपला मिळाली ऐतिहासिक आघाडी

0
8

दोन्ही मतदारसंघांतून मिळून 34 हजारांची आघाडी

लोकसभेच्या उत्तर गोव्यासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सत्तरी तालुक्यातील वाळपई व पर्ये या दोन्ही मतदारसंघांतील मतदारांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या दोन्ही मतदारसंघांतून भाजपला जवळपास 34000 मतांची आघाडी घेऊन दिली आहे. मात्र भाजपला वाळपई नगरपालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांत त्याचप्रमाणे केरी पंचायत क्षेत्र, भिरोंडा पंचायत क्षेत्र, माऊस पंचायत क्षेत्र या भागातील मुस्लिम बहुल मतदारांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.

वाळपई मतदारसंघातील नगरपालिका क्षेत्रामध्ये अवघ्या 208 मतांची आघाडी घेण्यास भाजप यशस्वी ठरलेला आहे.

वाळपईतून 13000 ची आघाडी
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपई मतदारसंघातून भाजपचे श्रीपाद नाईक यांना जवळपास 13000 मतांची आघाडी मिळालेली आहे. श्रीपाद नाईक यांना 18606, काँग्रेसचे रमाकांत खलप यांना 5601 तर आरजीचे मनोज परब यांना 3170 मते प्राप्त झालेली आहेत.
पर्ये मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांना तब्बल 20052 मतांची आघाडी मिळवून दिलेली आहे.

विकासाची पावती ः राणे
वाळपई व पर्ये या दोन्ही मतदार संघातून भाजपला भरभरून यश मिळाल्याची पोचपावती मतदारांनी दिली असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार दिव्या राणे यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षापासून दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप सरकारने भरभरून विकास केला. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा फायदा दोन्ही मतदारसंघातील अनेक मतदारांना झाला असल्याचे राणेयांनी सांगितले.